धक्कादायक : ‘शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र’च्या संकल्पानंतर २४ दिवसांत ८९ शेतकर्‍यांच्या आत्महत्या

farmer succied

मुंबई : नवनिर्वार्चित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी दिनानिमित्ताने १ जुलैला ‘शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र’चा पहिला संकल्प जाहीर केला. मात्र मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही अवघ्या २४ दिवसांत राज्यात तब्बल ८९ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यात औरंगाबाद, बीड, यवतमाळ जिल्ह्यांत सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. अतिवृष्टी, पूर अशी परस्थिती ओढावली असताना अनेक जिल्ह्यांमध्ये पंचनाम्यांना सुरवात झालेली नाही. जेथे पंचनामे सुरु झाले आहेत तेथे त्यांचा वेग अंत्यत संथ आहे. सलग दोन वर्ष नुकसान झाल्यानंतर किमान यंदा तरी पदरात काहीतरी पडेल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना होती. मात्र अतिपावसामुळे संपूर्ण खरिप हंगाम देखील हातून गेला आहे. नापिकी, कर्जबाजारीपणा यातून नैराश्य आल्याने शेतकरी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.

जिल्हानिहाय आत्महत्या
निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका हा मराठवाड्यातील शेतकर्‍यांना बसलेला आहे. शिवाय सरकारच्या घोषणा हवेतच विरलेल्या आहेत. त्यामुळे कर्जाचा डोंगर आणि नापिकी यामुळे गेल्या २४ दिवसांच्या काळात मराठवाडा विभागात ५४ शेतकर्‍यांनी आपले जीवन संपवले आहे. औरंगाबाद १५, बीड १३, यवतमाळ १२, अहमदनगर ७, परभणी ६, जळगाव ६, जालना ५, बुलडाणा ५, उस्मानाबाद ५, अमरावती ४, वाशिम ४, अकोला ३, नांदेड २, भंडारा-चंद्रपूरमध्ये २ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत.

नियमित कर्ज अदा करणार्‍या शेतकर्‍यांना १ जुलैपासून प्रोत्साहनपर रक्कम मिळणार होती त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. शेतकर्‍यांसाठी केवळ घोषणांचा पाऊस होत असून बांधावरची स्थिती ही वेगळी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ जुलै रोजी कृषीदिनानिमित्ताने ‘शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र’चा संकल्प करत राज्यातील शेतकरी संकटात येऊ नये म्हणून मोठे निर्णय घेत आहोत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या होऊ नये त्यासाठी देखील मार्ग काढला जात आहे. शेतकर्‍यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळावा यासाठी सरकार कटीबध्द आहे, असे म्हटले होते. मात्र, गेल्या २४ दिवसांमध्ये राज्यातील ८९ शेतकर्‍यांनी आपले जीवन संपवले आहे.

संवंग घोषणांपलीकडे जावून ठोस निर्णय हवेत
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत महाराष्ट्र शासनाने बळीराजा चेतना अभियान, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन स्थापन केले होते. सध्या हे दोन्ही उपक्रम बासनात गुंडाळले आहेत. एकीकडे महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. बियाणे, खते, किटकनाशकांपासून मजूरीचे दर गगनाला भिडले आहेत. दुसरीकडे त्या तुलनेत शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांवरील कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे. या शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर संवंग घोषणांपलीकडे जावून ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

Exit mobile version