कलिंगडची व्यापार्‍यांना विक्री न करता शेतकर्‍यांनीच हाती घेतली बाजारपेठ; असा होतोय फायदा

kalingad

जळगाव : शेतकरी अनेक संकटांना सामोरे जात शेतमाल पिकवत असला तरी घाऊक बाजारात त्याची विक्री करतांना शेतकर्‍यांपेक्षा व्यापार्‍यांनाच अधिक फायदा होतो, असा आजवरचा अनुभव राहिला आहे. मात्र आता शेतकर्‍यांनाही बाजारपेठेचे गणित समजायला लागले आहे. सध्या टरबूज आणि खरबूजचा सिझन सुरु झाला आहे. अनेक गावांमध्ये शेतकर्‍यांनी शेतमाल व्यापार्‍यांना न देता बाजारपेठेतच टरबूज आणि खरबूज विक्रीची दुकाने थाटली आहेत.

उन्हाळा सुरु होताच कलिंगड, खरबूजच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे व्यापारी थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन कलिंगड खरेदी करीत आहेत. मात्र प्रति किलो केवळ ६ ते ७ रुपये शेतकर्‍यांना दिले जातात तर बाजार व्यापार्‍यांकडून हेच कलिंगड १५ ते २० रुपये किलोने विकले जात आहे. प्रति कोलोमागे १० ते १२ रुपयांचे नुकसान होत असल्याने आता शेतकरीच व्यापार्‍यांची भूमिका निभावत आहे. शहराक जागोजागी स्टॉल लावून योग्य त्या दरात कलिंगडची विक्री केली जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नातही वाढ झाली शिवाय ग्राहकांनाही योग्य दरात कलिंगड मिळत आहे.

दरवर्षी फळ उत्पादक शेतकरी आपल्या शेतातील माल हा व्यापार्‍यांना विकत असतो, मात्र यावर्षी शेतकरी स्वतः बाजारात जाऊन आपल्या फळांची विक्री करण्याला प्राधान्य देत आहे. अनेक शेतकर्‍यांकडून शहरासह ग्रामीण भागात कलिंगड विक्रीचे स्टॉल लावण्यात आले आहेत. त्यामुळे तीन महिने केलेली मेहनत आणि आता मिळत असलेला मोबदला यामुळे शेतकरीही समाधानी आहे. गेल्या दोन वर्षात झालेले नुकसान भरुन काढण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत.

Exit mobile version