डॉ. पंजाबराव देशमुखांचे निवासस्थान स्मारक म्हणून घोषित करावे; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

Groundnut 1

अकोला : देशाचे पहिले केंद्रीय कृषी मंत्री, शिवाजी शिक्षण संस्थेचे, भारत कृषक समाजाचे संस्थापक कृषिरत्न भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख हे संपूर्ण देशाचे, कृषी समाजाचे वैभव आणि महाराष्ट्राची शान आहेत. अमरावती येथील त्यांचे निवास्थान सुद्धा महाराष्ट्राचा मान असून, त्याला राज्य शासनाने स्मारक म्हणून घोषित करावे, अशी मागणी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव कृष्णा अंधारे यांनी खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजीत पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचेकडे केली आहे.

अमरावती शहरामधील डॉ. पंजाबराव देशमुख यांची इमारत त्यांनी श्री. शिवाजी शिक्षण संस्था सुरू करतेवेळी महाराष्ट्र स्टेट को. ऑपरेटिव्ह बँकेत गहाण ठेवली होती. ती कालांतराने पैसे न भरू शकल्यामुळे आजपर्यंत बँकेच्या ताब्यात आहे. ती वास्तू शासनाने स्वतः बँकेकडून खरेदी करून डॉ. भाऊसाहेब अमरावती येथील स्मारक म्हणून घोषित करावे. आज रोजी श्री शिवाजी शिक्षण संस्था सुद्धा ती इमारत खरेदी करण्यासाठी सक्षम आहे. परंतु, शासनानेच जर हे पाऊल टाकले तर, संपूर्ण राज्यभरात एक चांगला संदेश जाईल व देशामध्ये महाराष्ट्र राज्याचा मान वाढेल.

ज्या पद्धतीने डॉ. बाबासाहेबांचे लंडन येथील निवासस्थान महाराष्ट्र शासनाने विकत घेतले त्याच पद्धतीने हे घर सुद्धा शासनाने विकत घेऊन आगामी अधिवेशनात ही घोषणा झाल्यास डॉ. भाऊसाहेबांवर प्रेम करणाऱ्यांकडून व जनतेकडून राज्य सरकारवरचा दृढविश्‍वास वाढेल. अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश संघटक सचिव कृष्णा अंधारे, जगदीश मुरुमकार, राजु वगारे, बळीराम कपले यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार, पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना फेब्रुवारी २०२२ मध्ये प्रत्यक्ष भेटून दिले होते. १० एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार अमरावती दौऱ्यावर असताना त्यांना भेटून सुद्धा कृष्णा अंधारे यांनी या विषयाची त्यांचेकडे आग्रहाची मागणी केली.

शेतकऱ्यांकडून मागणीला जोर
ज्यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य शेती व शेतकऱ्यांच्या हितासाठी, त्यांच्या विकासासाठी खर्ची घातले. ज्यांच्या नावाने विदर्भात कृषी शिक्षणाची गंगा वाहू लागली. ज्यांच्या जिवनाचा उद्देशच शेती आणि शेतकरी विकास होता, अशा शिक्षणमहर्षी, कृषिरत्न, महाराष्ट्रातीलच नव्हे तर, संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचे दैवत भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांना विदर्भात शिक्षणाची गंगा आणण्यासाठी स्वतःचे निवासस्थान गहाण ठेवावे लागले होते आणि ते अजूनही बँकेच्याच ताब्यात आहे. या कृषी दैवताचेच निवासस्थान अजूनपर्यंत बँकेच्या ताब्यात असेल तर, येथील शेतकऱ्यांचा काय विचार! राज्य सरकारने तत्काळ त्यांचे निवास्थान सोडवून ‘स्मारक’ म्हणून घोषित करावे, या मागणीला जोर धरत आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे सुद्धा कृष्णा अंधारे यांनी ही मागणी केली असल्याने, निश्‍चितच यावर सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version