मराठावाड्यात ‘टोकण पध्दती’ने पेरणी; जाणून घ्या शेतकर्‍यांचा नवा ‘पेरणी पॅटर्न’

farmer kharif

औरंगाबाद : १५ जून उजाडला तरी राज्यात अजूनही मान्सून पूर्ण ताकदीनिशी सक्रिय झालेला नाही. मराठवाड्यातही पेरणी योग्य पाऊस झालेला नसल्याने शेतकर्‍यांनी पेरणीचा नवा पॅटर्न अवलंबला आहे. ज्या शेतकर्‍यांकडे पाण्याची उपलब्धता आहे. त्यांनी टोकण पध्दतीने सोयाबीन पेर्‍याला सुरवात केली आहे. त्यामुळे पेरणी पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादनात वाढ होईल अशी अपेक्षा शेतकर्‍यांना आहे.

मराठवाड्यातील शेतकर्‍यांसाठी खरिप हंगामात सोयाबीन हे मुख्य पीक असून आता उत्पादन वाढीसाठी शेतकर्‍यांनी वेगवेगळे प्रयोग राबवण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत पारंपरिक पध्दतीने सोयाबीनचा पेरा केला जात होता. पण उत्पादनवाढीसाठी शेतकरी आता टोकण पध्दतीने पेरणीवर भर देत आहे.

टोकण पध्दत म्हणजे ज्या प्रमाणे हळदीची किंवा उसाची सरी काढून लागवड केली जाते तीच पध्दत सोयाबीनसाठी राबवायची आहे. यामध्ये साडेतीन फुट सरी काढून रोगराईचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बेड तयार केले जातात. सरीच्या दोन्ही बाजूस ९ इंचाच्या अंतरावर सोयाबीनची लागवड केली जाते. याची उगवण क्षमता अधिक असल्याने कमी कालावधीत पीक जोमात येते.

मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ही पध्दत राबवली जात आहे. शिवाय यासाठी कृषी विभागाचे मार्गदर्शनही महत्वाचे ठरत आहे. यामुळे बियाणांचा कमी वापर तर होतोच पण सरी पध्दतीने लागवड केल्याने पाणी साचून राहण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. परिणामी उत्पादनात वाढ होते. यंत्राच्या मदतीने पेरणी तर करता येतेच शिवाय यासाठी एकापेक्षा अधिकच्या मनुष्यबळाची गरज लागत नाही.

Exit mobile version