दोन एकर शेतीमध्ये उदरनिर्वाह होत नसल्याने शेतकर्‍याला हवे आहे हेलीकॉप्टर खरेदीसाठी कर्ज

helicopter loan

हिंगोली : गत दोन वर्षातील चारही हंगामांमध्ये कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे तर कधी बाजारपेठेतील अनिश्‍चितेमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. काहीही केले तरी शेती परवडतच नाही, अशी अनेक शेतकर्‍यांची धारण होत चालली आहे. त्यातच आर्थिक अडचणीत असतांना पीक कर्ज मिळवण्यासाठीही शेतकर्‍यांना बँकेत हेलपाटे मारावे लागतात. मात्र एका शेतकर्‍याने हेलीकॉप्टर घेण्यासाठी बँकेकडे कर्ज मागितले आहे. विशेष बाब म्हणजे, दोन एकर शेतीमध्ये उदरनिर्वाह होत नसल्याने शेतकर्‍याला हेलीकॉप्टर हवे आहे! हेलिकॉप्टर खरेदी करून भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी संबधित शेतकर्‍याने बँकेकडे कर्ज मागितल्याने या अजब मागणीची राज्यभर चर्चा होतेय.

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील शेतकरी कैलास पतंगे यांच्याकडे दोन एकर शेती आहे. त्यावर त्यांची आजी, आई, वडील यांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, मागील काही वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे निव्वळ शेतीवर उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. त्यातच पीक कर्ज देण्यासाठी बँकांचे अनेक कागदपत्रांचे अडथळे पार करावे लागतात. नाहरकत प्रमाणपत्र, सातबारावर बोजा टाकावा लागतो. मात्र, शेती गहाण ठेवूनही पीक कर्ज मिळत नाही. पीक कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागतात. यामुळे त्यांनी हेलीकॉप्टर खरेदी करुन ते भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी त्यांनी बँकेकडे कर्जाची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी स्टेट बँकेच्या व्यवस्थापकांची भेट घेवून निवेदनही दिले आहे.

एककडे विजय माल्ल्या, निरव मोदी सारखे बडे धेंड कोट्यावधी रुपयांची कर्जे घेवून ती बुडवतात व परदेशात पळून जातात. मात्र येथील शेतकर्‍यांना काही हजारांचे कर्ज देखील सहज मिळत नाही. नेमक्या या संवेदनशिल विषयाकडे पतंगे यांच्या मागणीमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले गेले आहे. त्यांच्या मागणीमुळे बँक अधिकारीही चांगलेच कोंडीत सापडले आहेत.

मोठे उद्योगपती हेलिकॉप्टर भाड्याने देऊन चांगले उत्पन्न मिळवतात. मग शेतकरी हा व्यवसाय का करू शकत नाही? शिक्षण घेऊन नोकरी मिळत नाही अन् शेती परवडत नाही. त्यामुळे हेलिकॉप्टर भाड्याने देण्याचा व्यवसाय निवडला असून त्यासाठी बँकेकडे कर्जाची मागणी केल्याचे कैलास पतंगे यांचे म्हणणे आहे.

Exit mobile version