बहरलेल्या भुईमूगाला वातावरणातील बदलाचा मोठा धोका; अशी घ्या काळजी

Groundnut

अकोला  ः जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी भुईमूग पिकाची लागवड झाली आहे. पीकही चांगले बहरले आहे. मात्र, वातावरणात होत असलेला बदलांचा आणि पिकांना सद्यस्थितीत योग्य पाणी व्यवस्थापन होऊ शकले नाही तर, लोहाची कमतरता जाणवून पीक पिवळे पडण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली असून, त्यासाठी योग्य व्यवस्थापण करण्याचा सल्ला दिला आहे.

उन्हाळी हंगामात आता भुईमूग पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होत असून, सध्या भुईमुगाचे पीक शेंगा धरणे व भरण्याच्या अवस्थेत आहे. मात्र, सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहेत. अशा परिस्थितीत पिकाला पाणी व्यवस्थापन करताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. या अवस्थेमध्ये भुईमूग पीक पिवळसर पडण्याची शक्यता असते. पिकास लोह या अन्नद्रव्याची कमतरता जाणवल्यास पीक पिवळसर पडते. जमिनीमध्ये पाणी साचून राहिल्यास लोह जमिनीमध्ये असून सुद्धा तो पिकास उपलब्ध होत नाही.

पाण्याचा निचरा झाल्यानंतर व डवरणी (पीक ४५ ते ५० दिवसाचे असे पर्यंतच करावी) झाल्यानंतर पिकास लोह पुन्हा उपलब्ध होतो व पिकाचा पिवळेपणा कमी होतो. लोहाची कमतरता असण्याची खात्री झाल्यानंतर १ लिटर पाण्यात ५ ते १० ग्रॅम हिराकस (फेरस सल्फेट) + १ ग्राम सायट्रिक असिड + २ ग्राम युरिया टाकून हे द्रावण पेरणी नंतर ३० ते ४० दिवसांनी पिकावर फवारावे. आवश्‍यकता असल्यास हीच फवारणी परत ३० दिवसानंतर करावी. उन्हाळी हंगामात पाण्याचा अनियंत्रित वापर केल्यास पिकास लोहाची कमतरता जाणवते. अवकाळी पाऊस आल्यास किंवा सतत ढगाळ वातावरण असल्यास पाणी व्यवस्थापनामध्ये योग्य तो बदल करावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

पीक सरंक्षण कसे करावे

फुलकिडे, तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी १० मिली किंवा ८ मिली, डिमॅटोन १५ टक्के प्रवाही औषध १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आणि पाने खाणारी अळी व पाने गुंडाळणारी अळीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन २० इ.सी  ४ मिली किंवा डेकामेथ्रीन २८ इ.सीय १० मिली किंवा किनॉसफॉस २५ इ.सी. २० मिली १० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे. टिक्का व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब (डायथेन एम-४५) १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

काढणी व उत्पादन

पीक तयार झाले म्हणजे पाने पिवळी पडू लागतात. शेंगाचे टरफल टणक बनते व शेंगाच्या टरफलाची आतील बाजू काळी दिसू लागते. अशा प्रकारे पीक तयार झाल्यावर काढणी वरील तंत्रज्ञानाचा वापर केल्यास खरीपात सरासरी १८ ते २० क्विंटल/हेक्टर तर उन्हाळी भुईमूगाचे २५ ते ३० क्विंटल/हेक्टर उत्पादन मिळू शकते.

Exit mobile version