नाशिक : वेलवर्गीय भाजीपाला पिकामध्ये काकडी, दोडका, कारले, दुधी भोपळा, तांबडा भोपळा, कलिंगड, खरबूज, पडवळ इ. भाजीपाला पिकांचा समावेश होतो. वेलवर्गीय भाजीपाला पिकांच्या फळामध्ये विविध जीवनसत्वे आढळत असल्याने या पिकांना आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थान आहे. दोन हंगामांमध्ये याची लागवड करता येते. खरीप हंगामात जून ते जुलै व उन्हाळी हंगामात जानेवारी ते फेब्रुबारी दरम्यान वेलवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड करता येते.
आळे पध्दत व सरी पध्दतीने वेलवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड करता येते. वेलवर्गीय भाजीपाळा पिकांची लागवड करण्यापुर्वी बियाणास बिजप्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे अनेक बुरशीजन्य रोग नियंत्रणात आणणे सोपे होते. त्यासाठी कॅप्टन किंया कार्बेन्डॅझिम २ ते ५ ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणात बियाणास चोळावे व त्यानंतर बियाणाची लागवड करावी. बियाणे लागवड केल्यानंतर १५ ते २० दिवसांनी वेलींना बांबुचा मंडप तयार करून आधार द्यावा.
खत व्यवस्थापन करताना सुरुवातीला २० टन चांगले कुजलेले शेणखत तसेच १०० किलो नत्र, ५० किलो स्फूरद व ५० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. यामधील अर्ध नत्र ब संपूर्ण स्फूरद ब पालाश लागवडीच्यावेळी द्यावे व राहिलेले अर्धे नत्र लागवडीनंतर एक महिन्याने द्यावे. वेलवर्गीय पिकांवर माबा, तुडतुडे आणि पांढरी माशी या रस शोषणार्या किडी तसेच फळमाशी, पाने खाणारे लाल भुंगेरे, ठिपक्याचे भुंगेरे, ब्रिस्टल बिटल आणि लाल कोळी या प्रमुख किडींचा प्रादुर्भाव होताना दिसून येतो. या किडीच्या व्यवस्थापनासाठी योग्य प्रमाणात कीटनाशकांचा वापर करावा. शक्यतो सेंद्रिय पध्दतीचा वापर केल्यास फायदा होतो.
सुधारित जाती
१) काकडी: हिंमागी, फुले शुभांगी, शितल, फुले प्राची इ.
२) दुधी भोपळा : सम्नाट,
३) सं.दुधी भोपळा: महाबीज-८१०
४) कारली : फुले ग्रीन गोल्ड, हिरकणी इ.
५) दोडका : पुसा नसदार, कोकण हरिता, फुले सुचेता इ.
६) कलिंगड: शुगर बेबी, अरका माणिक, अरका ज्योती इ.
७) खरबूज: पुसा सरबती, हरा मधु इ.
८) पडवळ : कोकण घेता इ.
९) तांबडा भोपळा : अका चंदन, अका सुर्यमुखी इ.