केळीच्या जाहीर दरापेक्षा कमी दराने खरेदी, आता मिळतोय केवळ इतका भाव

banana

जळगाव : जिल्ह्यातील केळी (Banana) उत्पादकांपुढील समस्यांची मालिका अजूनही संपायचे नाव घेत नाहीये. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट होवून शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत असतांना आता व्यापारीही शेतकर्‍यांची लूट करत आहेत. केळीची खरेदी ही बाजार समितीने जाहीर केलेल्या दराप्रमाणे करावी असा नियम आहे. रावेर बाजार समितीने दर्जेदार केळीसाठी २ हजार २०० असा दर जाहीर केला आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत त्यापेक्षा कमी दराने केळीची खरेदी केली जात आहे. सध्या केळीला केवळ १ हजार ते १ हजार २०० रुपये क्विंटल असा दर मिळत आहे.

यंदा केळीच्या उत्पादनात घट झाल्यामुळे केळीला विक्रमी दर मिळाला होता. कधीनव्हे ते २ हजार ५०० ते ३ हजार रुपये क्विंटल पर्यंत केळीचा दर गेला होता. मात्र, उच्चांकी दरावर पोहचलेल्या केळीच्या दरात कमालीची घसरण सुरु झाली आहे. आश्‍चर्य म्हणजे श्रावण महिना सुरु असतांना केळीला इतका कमी दर मिळत आहे. इतर फळांची बाजारपेठेत आवक वाढल्याचे कारण पुढे करीत केळीचे दर घटविण्यात आल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे. व्यापार्‍यांनी एकी करुन केळीचे दर घटवले असा आरोप होत आहे.

केळीचे घटते उत्पादन आणि वाढती मागणी पाहता केळीला अधिकचा दर मिळणे गरजेचे आहे. असे असतानाही जळगाव जिल्ह्यात मात्र, खरेदीदार हे दर पाडून मागणी करीत आहेत. शेतकर्‍यांनी विकण्यास नकार दिला तरी पुढचा खरेदीदारही त्याच तुलनेत मागणी करीत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. जळगाव वगळता राज्यात इतरत्र आणि परराज्यात केळीचे दर टिकून आहेत. मात्र जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांची व्यापारीवर्गाकडून आर्थिक लूट होत असल्याचा आरोप शेतकर्‍यांमधून होत आहे.

Exit mobile version