रब्बी हंगामातील गहू काढणी वेगात सुरू; मजूर टंचाईमुळे निवडला ‘हा’ मार्ग

gehu

पुणे : उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने रब्बी हंगामातील गव्हाची काढणी वेगात सुरू आली आहे. येत्या महिनाभरात पुणे विभागात ही काढणी संपण्याची शक्यता आहे. पाण्याची उपलब्धता चांगली असल्याने, रब्बी हंगामात अनेक ठिकाणी उत्पादन चांगले येत असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

गेल्या पंधरा दिवसांपासून गव्हाची काढणी सुरू झाली असून, पाऊस व पोषक वातावरण नसल्यामुळे उशिराने गव्हाच्या पेरण्या सुरू झाल्या होत्या. त्यामुळे काढणीही उशिराने सुरू झाली होती. पुणे विभागात गव्हाचे सरासरी एक लाख ३३ हजार ७० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी एक लाख ७० हजार ७० हेक्टर म्हणजेच १२८ टक्के पेरणी झाली होती. यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात देशी वाणासह, संकरित वाणाची पेरणी केली होती.

नदीकाठच्या व धरणाच्या परिसरात पाण्याची सुविधा असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्याचे सांगण्यात आले. परंतु विहिरींच्या पाण्यावर ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. त्या ठिकाणी पुरेसा पाऊस न झाल्यामुळे विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. पिकांना पाणी देण्यास अडचणी तयार झाल्याने, पिकांच्या वाढीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. उत्पादनात थोड्याफार प्रमाणात घट होण्याची शक्यता असली तरी,  कोरडवाहू भागात पुरेशा गव्हाच्या पेरण्या होऊ शकल्या नाहीत. त्याचा परिणामही उत्पादनावर होणार असल्याचे दिसून येते. असे असले तरी, बागायती भागात अधिक पेरण्यामुळे उत्पादनात घट होणार नाही.

दरवाढीचा परिणाम

सध्या गव्हाची काढणी वेगात सुरू असली तरी त्याला मजूरटंचाईचा मोठा फटका बसत आहे. त्यावर पर्याय म्हणून बहुतांशी शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाद्वारे थेट काढणी सुरू केली आहे.  त्यातच गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर वाढल्याने त्याचा परिणाम गहू काढणीवर होत असल्याचे दिसून येते.  

मजूरांची कटकट नको म्हणून हार्वेस्‍टर

दररोज वातावरणात होत असलेला बदल पाहता गहू काढणीची कामे करणे गरजेचे आहे. मात्र, मजुरांमुळे अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने, अनेक भागात हार्वेस्‍टर उपलब्ध करीत, त्याच्या मदतीने गहु काढणीला प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांनी देखील मजूरांची कटकट नको म्‍हणत हार्वेस्‍टरने गहू काढणीला सुरवात केली आहे.

एका एकरातील गहू वीस मिनिटात

हार्वेस्‍टरने एका एकरामधील गहू पंधरा ते वीस मिनिटात काढला जातो. दिवसभरात वीस ते पंचवीस एकरातील गहु यातून निघतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेची बचत होत असून काम देखील त्‍वरीत होत असल्याने अनेकांनी हार्वेस्‍टरच्या काढणीवर भर दिला आहे. मजुरांमार्फत ही कामे करण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, हार्वेस्‍टरमधून पंधरा ते वीस मिनिटात काम होते.  

Exit mobile version