जळगाव : पूर्वी सॅटेलाईट किंवा हवामानाचा अंदाज वर्तविणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान नव्हते तेंव्हाही शेतकरी आपल्या अनुभव कौशल्यांचा वापर करुन पाऊस कधी पडेल? याचा अचूक अंदाज वर्तवित होते. आजही अनेक गावांमध्ये वयस्कर शेतकरी पावसाच्या किंवा हवामान बदलावर अचूक भाष्य करतात. याला विज्ञानाची जोड असतेच मात्र जुन्या लोकांना केवळ त्याची व्याख्या माहित नव्हती. मात्र ते विज्ञान नक्कीच ठावूक होते.
जून्या लोकांचे पावसाबद्दलचे अंदाज अचूक का यायचेच? त्यांची निरिक्षणे काय होती? यावर प्रसिध्द हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी नुकतेच भाष्य केले आहे. याबाबत त्यांनी काही टिप्स देखील दिल्या. त्या पुढील प्रमाणे…
१) मृग नक्षत्र ७ जूनला सुरु होते. यावेळी उभं वार सुटते. अशा वेळी जर झाडवरील चिमण्या धुळीत अंघोळ करत असतील तर पुढच्या तीन दिवसांनी पाऊस येतो.
२) दिवस मावळताना सूर्याभोवती आभाळ तांबड्या कलरचे दिसलं की तीन दिवसानंतर पाऊस येतो.
३) लाईटवर किडे, पाकुळे आले की पुढच्या तीन दिवसात पाऊस पडतो
४) जून महिन्यात सूर्यावर जर तपकिरी कलर आला की पुढच्या ४ दिवसांनी पाऊस येतो.
५) सरडांनी जर आपल्या डोक्यावर लाल कलर केला की पुढट्या चार दिवसांनी पाऊस पडतो.
६) घोरपडी बिळाच्या बाहेर तोंड काढून बसत असतील तर पुढच्या चार दिवसात पाऊस पडतो.
७) गावरान आंबा जर मोठ्या प्रमाणात पिकला नाही तर पाऊस पडतो
८) ज्या वर्षी चिंचेला चिंचा जास्त लागतात त्यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असते.
९) आकाशातून विमान जात असताना त्याचा आवाज आला की पुढच्या ३ दिवसात पाऊस येतो. कारण पाण्याचे ढग वर असतात.
१५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. तर २२ जूनपर्यंत संपूर्ण देशात पाऊस पडेल असेही डख यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षापासून पावसाचे प्रमाण वाढले आहे, कारण मान्सून पूर्वेकडून येत आहे. ज्यावेळी मान्सून पूर्वेकडून येतो त्यावेळी पाऊस जास्त पडतो. यावर्षी देखील मान्सून पूर्वेकडूनच आला असून, पावसाचे प्रमाण जास्त असल्याचं डख यांनी सांगितलं. जितकी झाड जास्त तिकडे पाऊस रिमझिम पडतो. ज्या ठिकाणी झाडांचे प्रमाण कमी आहे, त्याठिकाणी पाऊस रिमझीम होत नाही. रिमझीम पाऊस चागला असतो. त्यामुळं झाड लावणं काळाची गरज असल्याचे डख म्हणाले. झाडे कमी असतील की तापमानात वाढ, वादळे, तर काही ठिकाणी गारपीट होते असेही डख यांनी सांगितलं.