पावसामुळे वाढणार शेतकर्‍यांना औषध, कीटकनाशक फवारणीचा खर्च

favarani Pesticides 1

नाशिक : गत दहा दिवसांपासून राज्यभर पावसाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी जमीनीच खरडवल्या गेल्या आहेत. काही ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचले आहे. यामुळे शेतकरी अधिकच संकटात अडकला आहे. मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये साचलेले पाणी, ढगाळ वातावरण, पावसाची रिपरिप यामुळे पिकांवरील रोगराई वाढून औषधोपचाराचा खर्च वाढणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

ढगाळ वातावरण आणि पावसामुळे पिकांवरील औषध फवारणीचा खर्च वाढला आहे. कांद्याच्या पातीवर पांढरे डाग पडल्याने होल पडले असल्याने उत्पादनापेक्षा औषधोपचाराचाच खर्च वाढल्याने शेती करायची कशी असा शेतकर्‍यांना पडला आहे. पिकांवर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने सध्या कीटकनाशकांची फवारणीच्या कामात शेतकरी व्यस्त झाला आहे. सध्याच्या वातावरणातील बदलाचा विपरीत परिणाम पिकांवर होत आहे.

गत काही दिवसांपासून रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून, महागडी औषधे फवारणी करावी लागत असल्याने भांडवली खर्चात वाढ होत आहे. टोमॅटो, वांगी, कोबी, फ्लॉवर, कांदापात, कोथिंबीर, मेथी, गवार या पिकांवर कीड, करपा, बोकड्या, आकसा, भुरी, मावा, तुडतुडे आदी रोग वाढले आहेत. बदलत्या वातावरणामुळे पिके धोक्यात आली आहेत. औषध फवारणी खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वीच फवारणी करावी लागत आहे.

Exit mobile version