शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी : राज्यात पुन्हा हरभरा खरेदी केंद्र सुरु

Gram harbhara

पुणे : राज्यातील हरभरा खरेदी केंद्र ही मुदतीपूर्वीच बंद करण्यात आली होती. यामुळे बंद केंद्रांबाहेर देखील शेतकरी रांगा लावून उभा होता. दुसरीकडे हरभराच्या दरामध्ये घट होत असल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढत होती. या विरोधात असंतोष निर्माण होत असल्याने राज्य सरकारच्या मागणी नंतर पुन्हा हरभरा खरेदी केंद्र ही सुरु झाली आहेत. मात्र, १८ जूनपर्यंतच ही खरेदी केंद्र सुरु राहणार असून यासाठी नियम-अटीही लादण्यात आल्या आहेत.

राज्यात नाफेडच्या माध्यमातून १ मार्चपासून खरेदी केंद्र ही सुरु करण्यात आली होती. हरभरा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे नाफेडने बंदचा निर्णय घेतला होता. पण ज्या शेतकर्‍यांनी विक्रीसाठी नोंदणी केली त्यांचे काय असा सवाल उपस्थित होत होता.

आता १८ दिवसांमध्ये शेतकर्‍यांना हरभर्‍याची विक्री ही करावी लागणार आहे. आता पुन्हा ही खरेदी केंद्र सुरु करण्यात आली असली तरी १७ मे पूर्वी ज्या शेतकर्‍यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे अशाच शेतकर्‍यांचा माल खरेदी केला जाणार आहे. आता नव्याने शेतकर्‍यांना नोंदणी करता येणार नाही. त्यामुळे नोंदणी करुन घेतलेल्या शेतकर्‍यांसाठीच पु्न्हा ही खरेदी सुरु करण्यात आली आहे.

खुल्या बाजारपेठेत हरभर्‍याला ४ हजार ५०० तर खरेदी केंद्रावर ५ हजार ३०० असा दर आहे. क्विटंलमागे ८०० रुपयांचा फरक असल्याने शेतकर्‍यांचा कल हा खरेदी केंद्राकडे वाढत असतानाच राज्यातील खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकर्‍यांची अडचण झाली होती. आता खरेदी केंद्र पुन्हा सुरु झाल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Exit mobile version