धान उत्पादकांना दिलासा, जाणून घ्या जिल्हा फेडरेशनचा निर्णय

Natural farming by a young farmer in 12 acres

गोंदिया : रब्बी हंगामात धान पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे खुल्या बाजारपेठेत दर कमी असल्याने शेतकर्‍यांनी खरेदी केंद्रावरील हमी भावावरच भर दिला. चुकार्‍यांसाठी वेळ का लागेना पण अधिकचा दर मिळावा ही शेतकर्‍यांची अपेक्षा होती. त्यानुसार खरेदीही झाली. मात्र, १५ दिवसांमध्ये अदा केले जाणारे बील तब्बल तीन महिने उलटून गेले तरी शेतकर्‍यांना पैसे मिळाले नव्हते. मात्र आता १ ऑगस्टपासून चुकारे अदा करण्याचा निर्णय जिल्हा फेडरेशनने घेतला आहे.

रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणार्‍या शेतकर्‍यांचे ४१ कोटी ९१ लाख रुपयांचे चुकारे मागील दोन-तीन महिन्यांपासून थकले होते. यामुळे शेतकर्‍यांचा रब्बी हंगाम संकटात आला होता, अखेर थकीत चुकार्‍यांसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला शनिवारी निधी प्राप्त झाल्याने सोमवारपासून थकीत चुकारे शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यास प्रारंभ केला जाणार आहे.

केंद्रावर धान पिकाची खरेदी झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांनी शेतकर्‍यांना त्यांचे पैसे द्यावेत असा नियम आहे. यंदा मात्र, तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी शेतकर्‍यांना पैसे मिळाले नव्हते. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. त्यातच अधिकच्या पावसामुळे शेतकर्‍यांचा खते, किटकनाशकांसह मजूरीचा खर्चही वाढला असल्याने शेतकर्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता ऐन सणासुदीच्या काळात हे चुकारे अदा करण्याचा निर्णय जिल्हा फेडरेशनच्या माध्यमातून घेण्यात आल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Exit mobile version