शेतकऱ्यांनी तांदळाच्या वाणाला दिलेय माजी पंतप्रधानांचे नाव, जाणून घ्या कोण?

rice

फोटो प्रतीकात्मक

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या नावावर अनेक नेते व पक्षांचे राजकारण चालते. फक्त एकाच पक्षाला शेतकर्‍यांची काळजी असते, तो म्हणजे ‘विरोधी पक्ष’! असे हेटाळणीच्या स्वरात नेहमी म्हटले जाते. मात्र काही नेते खरोखरच शेतकरी नेते असतात. असेच एक नेते थेट देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. त्यांनी शेतकर्‍यांसाठी घेतलेल्या निर्णयांमुळे शेतकऱ्यांनी तांदळाच्या एका वाणाला त्यांचे नाव दिले.

माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांची ओळख प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे नेते अशी आहे. शेतकऱ्यांप्रती त्यांच्या बांधिलकीचा सन्मान म्हणून पंजाबच्या शेतकऱ्यांनी तांदळाच्या एका वाणाचे नाव देवेगौडा ठेवल्याचे त्यांच्या आत्मचरित्रातून समोर आले आहे. पत्रकार सुगाता श्रीनिवास राजू यांनी लिहिलेल्या फ्यू रोज इन ए फील्ड : द अनएक्स्पोअर्ड लाइफ ऑफ एच.डी. देवेगौडा’ या पुस्तकाच; नुकतेच प्रकाशन झाले. या पुस्तकात दैवेगौडा यांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. शेतकर्‍यांप्रतिची बांधिलकी आणि १९९६-९७ वर्षी शेतकर्‍याला अनुकूल ठरणारा अर्थसंकल्प सादर केल्यामुळे पंजाबच्या शेतकर्‍यांनी धानाच्या एका वाणाला देवेगौडा नाव दिले आहे. या वेळी देवेगौडा पंतप्रधानपदी विराजमान नव्हते. देवेगौडा यांना आपल्या नावावर पंजाबमध्ये धानाचे वाण आहे, अशी काहीही कल्पना नव्हती. कर्नाटक केडरचे पंजाबचे आयएएस अधिकारी चिरंजीवसिंग यांनी २०१४ मध्ये एका वृत्तपत्रीय स्तंभलेखनात याची माहिती दिल्यानंतर देवेगौडांना हे माहीत झाल्याचे पुस्तकात नमूद केले आहे.

३१ जुलै आणि १ ऑगस्ट १९९१ रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या पहिल्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होती. सरकारने शेती क्षेत्रासाठीची सबसिडी मागे घेण्याचा निर्णय मागे घ्यावा यासाठी देवेगौडा आक्रमक झाले होते. यासाठी ते अध्यक्षांसमोरील हौद्यातही उतरले होते. मी शेतकरी असून सरकारचा हा निर्णय लागू होऊ देणार नाही, मी धरणे देईन. सभागृहाबाहेर जाणार नाही आणि मी हे प्रसिद्धीसाठी करत नाही, अशी भूमिका देवेगौडा यांनी तेव्हा घेतली होती. २००२ मध्ये देशाच्या विविध राज्यांत शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा आकडा वाढत होता. त्यादरम्यान देवेगौडा कर्नाटकातून रेल्वेने २ हजार शेतकर्‍यांचे शिष्टमंडळ घेऊन तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भेट घेण्यासाठी गेले होते. एका माजी पंतप्रधानांनी अशा प्रकारे आंदोलन करण्याची कदाचित पहिली वेळ होती.

Exit mobile version