कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल शरद पवारांना ‘डॉक्टरेट’

sharad-pawar-doctorate

शेत शिवार । अहमदनगर – कृषी क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांना राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. कृषी विकास आणि कृषी तंत्रज्ञानाच्या प्रसारात अग्रेसर असणार्‍या महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून हा गौरव प्राप्त होणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मी कृतज्ञतापूर्वक या सन्मानाचा स्वीकार करतो. तसेच, देशभरातल्या ज्या असंख्य शेतकर्‍यांनी माझ्यावर विश्वास ठेवून अलोट प्रेम केले, त्या शेतकर्‍यांना मी हा सन्मान समर्पित करतो, असे शरद पवार यांनी यावेळी बोलताना म्हटले.

शरद पवार यांचे कृषी क्षेत्रासाठी मोठं योगदान आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी शेती संदर्भातील विविध समित्या आणि खात्यांमध्ये महत्त्वाच्या पदावर काम केलं आहे. विशेष म्हणजे देशाचे कृषीमंत्री म्हणूनही त्यांनी १० वर्षे काम केले आहे. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांसाठी त्यांनी सातत्याने नाविण्यापूर्व प्रयोग केले आहेत. शरद पवार यांच्या कृषी क्षेत्रासाठी योगदानाची दखल घेऊनच हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.

कृषी तंत्रज्ञान शिक्षण मराठी भाषेतून द्या – राज्यपाल

कोवीड काळात सर्व उद्योग बंद असतांना या देशाला तारण्याचे काम देशाच्या शेती क्षेत्राने केले. तेव्हा शेतीला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे. त्याचबरोबर कृषी व तंत्रज्ञान या  विषयांचे शिक्षण मराठी भाषेतून  देण्यासाठी कृषी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत. असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये उत्कृष्ट दर्जाचे संशोधनाचे काम होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या कौशल्याने वापर करत नावीन्यपूर्ण काम झाले आहे. विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक वृत्ती ठेवत काम केल्यास देशाची वाटचाल विकासाकडे होईल. तसेच कृषी विद्यापीठांनी आपल्या मराठी मातृभाषेचा सन्मान करत कृषी व तंत्रज्ञानाचे शिक्षण व कामकाज मराठी भाषेतून करण्यावर भर द्यावा. कृषी विद्यापीठांनी अधिकाधिक पेटंट प्राप्त करावेत. सेंद्रिय व जीआय तंत्रज्ञानावर आधारित शेती व्हावी. यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

Exit mobile version