बियाणे उगवण क्षमता तपासणी करण्याच्या सोप्या पध्दती

Seeds

सातारा : पेरणीनंतर उगवण झाली नाही किंवा उगवण झाल्यानंतर पिकांची योग्य वाढ झाली नाही, असे प्रकार अनेकवेळा घडतात. याचे मुख्य कारण म्हणजे, गुणवत्ता नसलेली बियाणे होय. यामुळे शेतकर्‍यांचा वेळ, पैसा, मनुष्यबळ व संपूर्ण हंगामही वाया जातो. यामुळे पेरणीआधी बियाण्यांची उगवण क्षमता तपासणे गरजेचे असते. आज आपण बियाणे उगवड क्षमता तपासणी करण्याच्या सोप्या पध्दती जाणून घेणार आहोत. या प्रामुख्याने गोणपाट वापरुन, वर्तमानपत्राचा कागद वापरुन किंवा पाण्यात भिजवून बियाण्यांची उगवण क्षमता तपासता येते.

गोणपाट वापरुन :
बियाण्याच्या प्रत्येक पोत्यातून मुठभर धान्य घ्या. सर्व पोत्यातून काढलेले धान्य एकत्र करुन घ्या गोणपाटाचे सहा चौकोनी तुकडे घेऊन स्वच्छ धुवून घ्या. एक तुकडा जमीनीवर पसरवा. पोत्यातून काढलेल्या धान्यातून सरसकट १०० दाणे मोजून दीड-दोन से.मी. अंतरावर १०-१० च्या रांगेत गोणपाटाच्या एक तुकडयावर ओळीत ठेवावे अशा प्रकारे १०० दाण्याचे ३ नमुने तयार करावे. गोणपाटावर चांगले पाणी शिंपडून ओले करावे व बियाण्यांबर दुसरा गोणपाटाचा तुकडा अंथरुन पुन्हा चांगले पाणी मारावे.

गोणपाटाच्या तुकड्याची बियाण्यांसकट गुंडाळी करुन थंड ठिकाणी सावलीत ठेवा त्यावर अधून-मधून पाणी शिंपडून ओले ठेवा. ६-७ दिवसानंतर ही गुंडाळी जमीनीवर पसरुन उघडा चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करा व मोजा. तिनही गुंडाळयांची सरासरी काढुन १०० दाण्यांपैकी ७० किंवा त्यापेक्षा जास्त दाणे जर चांगले कोंब आलेले असतील तर बियाणे बाजारातील बियाण्यासारखेच गुणवत्तेचे आहे असे समजा. जर उगवण झालेल्या बियाण्याची सरासरी संख्या ७० पेक्षा कमी असेल तर एकरी बियाण्यांचे प्रमाण थोडे वाढवून पेरणी करा. पेरणी करताना बियाण्यास बुरशीनाशकांची व जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करण्यास विसरु नका.

वतर्मानपत्राचा कागद वापरुन :
वर्तमानपत्राचा एक कागद घेऊन त्याच्या चार घड्या पाडाव्यात त्यामुळे कागदाची जाडी वाढेल. नंतर तो पुर्ण कागद पाण्याने ओला करावा. प्रत्येकी दहा बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून वर्तमानपत्राच्या टोकाच्या भागावर ठेवून त्याची गुंडाळी करावी. अशा रीतीने शंभर बियांच्या दहा गुंडाळया तयार कराव्यात. त्या गुंडाळया पॉलिथीन पिशवीत चार दिवस तशाच ठेवाव्यात. चार दिवसानंतर त्यामधील अंकुर मोजावे.

पाण्यात भिजवुन :
बियाण्याच्या प्रत्येक पोत्यातुन मुठभर धान्य घ्या. सर्व पोत्यातुन काढलेले धान्य एकत्र करुन घ्या त्या नमुन्यातुन १०० दाणे मोजून वेगळे काढा असे १०० दाण्यांचे ३ संच तयार करा. शक्यतो काचेच्या तीन ग्लासात पाणी घेऊन त्यात हे १०० दाणे टाका.५ ते ७ मिनीट तसेच राहु द्या. त्यानंतर पाणी फेकुन देऊन दाणे वेगळे काढा व त्यामधील पूर्णता फुगलेले तसेच बियाण्याच्या टरफलावर सुरुकुत्या पडलेले दाणे वेगळे करा. दोन्ही प्रकारच्या दाण्यांची संख्या मोजून घ्या. जो दाणा ५-६ मिनीट पाण्यात ठेवल्यानंतर चांगला टम्म फुगतो तो पेरणीसाठी अयोग्य असतो. १०० दाण्यांपैकी जर सरासरी ७० किंवा जास्त दाणे अशाप्रकारे न फुगलेले, सुरकुत्या न पडलेले असेल तर बियाणे बाजारातील बियाण्यासारखेच गुणवत्तेचे आहे असे समजा आणि शिफारशी प्रमाणे मात्रेत पेरणीसाठी वापरा. जर उगवण झालेल्या बियाण्याची सरासरी संख्या ७० पेक्षा कमी असेल तर एकरी बियाण्यांचे प्रमाण थोडे वाढवून पेरणी करा.

Exit mobile version