ओमिक्रॉन विषाणूची सोयाबीन दराला बाधा

soyabean-market-rate-corona-omicron

शेत शिवार । लातूर : कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉनने जगभरात दहशत पसरवली आहे. याचा परिणाम अनेक क्षेत्रांवर जाणवू लागला आहे. गत आठवडाभरापासून शेअर बाजारात होत असलेली चढ-उतार ओमिक्रॉनचाच परिणाम आहे. या ओमिक्रॉनचा फटका शेतकर्‍यांना बसतांना दिसू लागला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात ४०० रुपयांनी घसरण झाली आहे. सोयापेंडची मागणी, कोमोडीटीवर घसरलेले दर आणि ओमिक्रॉन विषाणूमुळे निर्यातीस होणार्‍या अडचणीमुळे हे दर घसरले असल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.

दिवाळीनंतर एकदाही सोयाबीनच्या दरात घट झाली नव्हती. एकतर दरात वाढ किंवा स्थिरता हे दोनच प्रकार होत होते. पण या आठवड्याची सुरवात शेतकर्‍यांची चिंता वाढवणारी झाली आहे. यंदाच्या हंगामात सोयाबीनची आवक आणि दर याचे गणित थोडसे वेगळेच राहिले आहे. दर वाढले तरी आवक ही कमीच होती आणि दर कमी झाले तरी आवक ही वाढलेली नव्हती. सोयाबीनच्या वाढीव दराबाबत शेतकर्‍यांना विश्वास होता. त्यानुसार दर वाढलेही.

एका महिन्यात दीड हजाराने सोयाबीनचे भाव वाढले तर दोन दिवसांमध्ये ४०० रुपयांनी घसरलेले आहेत. ओमिक्रॉन विषाणूमुळे निर्यातीवर बंधने आल्याने सोयाबीनला मोठा फटका बसला आहे. येणार्‍या नजिकच्या काळात परिस्थितीत सुधारणा न झाल्यास अन्य कृषीमालाच्या दरांवर देखील परिणाम दिसून येतील, अशी शक्यता कृषीतज्ञांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version