मजूर टंचाईवर शोधला जालीम उपाय; शेतातील तण काढण्यापासून कीटकनाशक फवारणीसाठी अत्याधुनिक मशिन

favarani Pesticides

पुणे : शेतकर्‍याची सर्वात मोठी डोकंदुखी म्हणजे, मजूरांची टंचाई. पेरणीपासून पीक काढणीपर्यंत मजूरांची गरज पडते. मात्र अपेक्षेपेक्षा जास्त मजूरी देवूनही मजूर मिळत नाहीत अशी परिस्थिती कमी अधिक प्रमाणात सर्वदूर आहे. वेळेत मजूर न मिळाल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत असते. यापार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांचे मजूरांवरील अवलंबत्व कमी करण्यासाठी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल इंजिनीअरिंग, भोपाळने ई-प्राइम मूव्हर मशिन तयार केले आहे. जे शेतकर्‍यांच्या समस्या बर्‍याच अंशी कमी करू शकते.

या यंत्राच्या आगमनाने शेतकरी शेतात तण काढण्यापासून ते कीटकनाशक फवारणीपर्यंतची कामे अगदी सहजतेने करू शकतील आणि त्यांचे मजुरांवरील अवलंबित्वही कमी होईल. तसेच हे उपकरण दोन क्विंटलचा भार सहज उचलू शकते. म्हणजेच शेतातून धान्य वाहून नेण्यात आणि आणण्यात हे यंत्र खूप चांगले काम करेल. या मशिनला चार्ज होण्यासाठी तीन तास लागतात, एक क्विंटल भार वाहून नेता येतो. या मशिनचे वैशिष्ट्य म्हणजे ते सौरऊर्जेसोबतच बॅटरीवरही चालू शकते. हे डॅशबोर्ड बॅटरी मॉनिटरिंग सिस्टम, आपत्कालीन स्टॉप स्विच, डिजिटल स्पीड इंडिकेटर, लोड करंट आणि व्होल्टेज मॉनिटरिंग सिस्टम, सेफ्टी स्विच आणि इतर सर्व सुरक्षा उपकरणांनी सुसज्ज आहे.

भोपाळच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल इंजिनीअरिंगच्या म्हणण्यानुसार, या मशीनच्या मदतीने दीड एकर क्षेत्रात औषध फवारणीसाठी फक्त एक तास लागेल. त्याचबरोबर हे यंत्र अवघ्या ५ तासात तेवढीच जमीन खुरपणी आणि नांगरणीचे काम करेल. वीज नसल्यास घरातील दिवे लावण्यासाठी तुम्ही या सौरऊर्जेवर चालणार्‍या मशीनचा वापर करू शकता. सोलर पॅनेलसह सोलर असिस्टेड ई-प्राइम मूव्हर मशीनची किंमत सुमारे ३.१० लाख रुपये आहे आणि सोलर पॅनेलशिवाय सुमारे १.८० लाख रुपये आहे. ऑपरेटिंग कॉस्ट ५०० रुपये प्रति तास आहे.

Exit mobile version