अजून वीस लाख टन ऊस गाळपाचा अंदाजनगर विभागातील स्थिती; १ कोटी ७१ लाख टन गाळप

sugar

नगर : नगर, नाशिक जिल्ह्यांत आतापर्यंत १ कोटी ७१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. अजून सुमारे वीस ते बावीस लाख टन ऊसगाळप होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत दोन कारखान्यांनी गाळप हंगाम आटोपला आहे. उन्हाची तीव्रता, गाळप हंगाम आटोपता होत असल्याच्या धास्तीने ऊस तोडण्यासाठी शेतकऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.

नगर, नाशिक जिल्ह्यात यंदा २७ साखर कारखाने सुरू आहेत. दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर ऊस उपलब्ध होता. साधारणपणे ८५ टनाचे उत्पादन ग्रहीत धरुन सुमारे १ कोटी ८० लाख टनांपेक्षा अधिक ऊस उपलब्ध होणार होता. त्यासोबत कार्यक्षेत्राबाहेरील ऊसही आणला जाईल, असे कारखान्यांकडून सांगितले होते. विभागातील साखर कारखान्याची दैनिक गाळप क्षमता १ लाख १० हजार टन असून दररोज ९० ते ९५ हजार टन उसाचे गाळप होत होते. आतापर्यंत १ कोटी ७१ लाख टन उसाचे गाळप झाले असून, १ कोटी ६० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन निघाले आहे. यंदा विक्रमी म्हणजे १कोटी ५७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

नगर जिल्ह्यात आतापर्यंत १ कोटी ५६ लाख टन उसाचे गाळप झाले असून, सर्वाधिक आंबिलिका कारखाने एक लाख १७ लाख ६१ हजारांचे गाळप केले आहे. त्यापाठोपाठ मुळा कारखान्याने १२ लाख १७ हजार, ज्ञानेश्‍वर कारखान्याने १३ लाख ३८ हजर, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याने १२ लाख ४५ हजार टन उसाचे गाळप केले आहे. गंगामाई कारखान्याने ११ लाख ५० हजार टन उसाचे गाळप केले आहे. अजून नगर जिल्ह्यात १५ ते १७ लाख टन, तर नाशिक जिल्ह्यात ५ लाख टनांच्या जवळपास गाळप होण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत नगर व नाशिकमध्ये प्रत्येकी एका कारखान्याने गाळप हंगाम गुंडाळला आहे. उसाची तोड होत नसल्याने ऊस उत्पादक मात्र हतबल आहेत.

नगर, नाशिक जिल्ह्यांत जास्तीच्या उसाचा प्रश्‍न आहे. कमी दराने ऊस मिळत असल्यामुळे साखर कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील नोंदी असलेला व तोडणीला आलेला उसाऐवजी बाहेरच्या उसाला प्राधान्य दिले आणि स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा गेल्या महिनाभरापासून सतत आरोप होत आहे. त्यात मागील आठवड्यात शेवगाव तालुक्यातील शेतकरी आत्महत्येमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांत संताप व्यक्त होतो आहे शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी साखर कारखान्यांनी कार्यक्षेत्राबाहेरून किती ऊस आणला आणि कार्यक्षेत्रातील किती ऊस तोडला याची चौकशी करून आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे उसाच्या प्रश्‍नात कार्यक्षेत्राबाहेरील ऊसही चर्चेत येत आहे.

Exit mobile version