कमी पावसाच्या भागात भात शेतीचा यशस्वी प्रयोग; दौंड तालुक्यातील शेतकर्‍यांची किमया

rice

फोटो प्रतीकात्मक

नगर : कोकणात भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. कारण या भागात जास्त पाऊस पडतो. ज्या भागात जास्त पाऊस त्या भागात भात शेती, असे साधारणत: गणित असते. मात्र ज्या कमी पाऊस पडणार्‍या भागात यशस्वीरित्या भात शेती करुन दाखविण्याची किमया दौंड तालुक्यातील दोन शेतकर्‍यांनी करुन दाखविली आहे. तालुक्यातील खडकी येथील संदीप काळे आणि रंगनाथ काटे यांनी ३ एकरावर इंद्रायणी भाताच्या वाणाची लागवड केली आहे.

दौंड तालुक्यात मोठया प्रमाणावर ऊस उत्पादक शेतकरी आहेत. ऊस पिकाला पर्याय म्हणून रंगनाथ काटे आणि संदीप काळे यांनी मिळून खडकी गावात ३ एकरावर इंद्रायणी भात पिकाची लागवड केली. यासाठी लागणारी रोपे त्यांनी तळेगांववरुन आणली होती. दौंड तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्यानं २ ते ३ गुंठ्याची भाताची खाचरे तयार केली. ही खाचरे भात शेतीत पाणी साठून राहण्यासाठी तयार केली आहेत. त्याच खाचरात विहिरीचे पाणी सोडले जात असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

भाताच्या पिकाला एकरी १० हजार रुपये त्यांना खर्च आला असल्याचे सांगितले. तसेच एका एकरात १५ ते १६ क्विंटल उत्पादन मिळते. त्याची विक्री ही ६० रुपये किलोने होत असल्याची माहिती शेतकर्‍यांनी सांगितली. उसाला १८ महिने सांभाळावे लागते. तसेच ऊस पिकाला भाताच्या तुलनेत खर्च मोठ्या प्रमाणावर येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्या तुलनेत भात पिकाला खर्च कमी येतो. यामुळे ऊसाला भात शेती हा सक्षम पर्याय असल्याचे या शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

Exit mobile version