पाऊस लांबला; पेरणीबाबत कृषी विभागाच्या ‘या’ आहेत महत्वाच्या सुचना

farmer-waiting-for-rain

जळगाव : निम्मा जून महिना उलटला तरीही महाराष्ट्रातील बहुतांश भागात पेरणी योग्य पाऊस झालेलाच नाही. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पेरण्या रखडल्या आहेत. ज्या शेतकर्‍यांनी घाईघाईने पेरण्या केल्या त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत असतांना पावसाच्या अनिश्चितीमुळे १५ जुलैपर्यंत पेरणी केली तरी उत्पादनात घट होणार नाही. शेतकर्‍यांनी घाईत निर्णय घेऊ नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

गतवर्षी कापसाला विक्रमी दर मिळाल्याने कापसाच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. त्याच बरोबर कमी कालावधीत अधिकच्या उत्पादनासाठी ओळखल्या जाणार्‍या सोयाबीनचा पेराही वाढणार असल्याचा कृषी विभागाचा दावा आहे. खरीप हंगामातील सोयाबीन आणि इतर पिकांच्या पेर्‍यात उशीर झाला तरी त्याचा उत्पादनावर परिणाम होणार नाही. पण प्रमाणापेक्षा जमिनीत ओल नसल्यास शेतकर्‍यांवर पुन्हा दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे.

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये २२ जूननंतरच पाऊस सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी २२ जूननंतरच चाढ्यावर मूठ ठेवली तर ते फायद्याचे राहणार आहे. शिवाय खरिपाची पेरणी ही १५ जुलैपर्यंत केली तरी त्याचा उत्पादनावर परिणाम होणार नसल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

उशीरा पेरण्या झाल्या तरी सोयाबीनच्या उत्पादकतेवर परिणाम होणार नाही पण कापूस, तूर, मूग या पिकाच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. शेतकर्‍यांनी कमी कालावधीत येणार्‍या सोयाबीन वाणाचा वापर हा यंदा फायद्याचा राहणार आहे. सध्याच्या काळ पेरणीसाठी योग्य होता पण पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकर्‍यांना वाट पहावीच लागणार आहे. यामुळे शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करु नये, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version