ग्रामीण भागातील महिला बचतगटांचा ‘सुपर शॉपींग मॉल’

women bachat gat

अहमदनगर : सुयोग्य मार्गदर्शन व सहाय्य मिळाल्यास महिला आपल्या कर्तृत्वानं पुरूषांची मक्तेदारी असलेल्या व्यवसायांमध्ये उंच भरारी घेऊ शकतात… याचे उत्तम उदाहरण म्हणजे अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी गावातील महिला…! या महिलांनी शासनाच्या पाठबळाने बँकेतून कर्ज घेत बचतगटाद्वारे चालविला जाणारा जिल्ह्यातील पहिला ‘सुपर शॉपींग मॉल’ सुरू केला आहे. हा अभिनव उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक ठरला आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत संगमनेर तालुक्यात बचतगटांचे जाळे निर्माण झाले आहे. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक रवींद्र खलाटे, तालुका समन्वयक प्रशांत पानसरे, प्रभाग समन्वयक रेश्मा पाटील यांनी अनेक बचतगट स्थापन केले आहेत. बचतगट स्थापन झाल्यावर त्या बचतगटांतील महिला सदस्यांचा कल लक्षात घेऊन त्यांना व्यवसाय करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेच्या सहकार्यानं कर्ज पुरवठा मिळून देणं, त्यांना व्यवसायासाठी लागणारे व्यावसायिक कौशल्याचे प्रशिक्षण देण्याचं काम ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून केले जाते.

या अभियानामधून ‘घुलेवाडी’ गावात दहा महिलांनी एकत्र येऊन बचतगट स्थापन केले. बघता बघता गावात 30 स्वयंसहायता गटांची स्थापना झाली.या गटांचे मिळून ‘रुक्मिणी महिला ग्रामसंघा’ची स्थापना करण्यात आली. ‘ग्रामसंघा’च्या माध्यमातून गावातील वेगवेगळ्या गटातील महिला एकत्रित आल्या आणि विचारांची देवाण-घेवाण झाली.कोरोना कालावधीत सर्व काही बंद होते ; परंतु जीवनावश्यक वस्तू ची सुविधा चालू होती. हे लक्षात घेऊन ‘ग्रामसंघा’तील 6 महिलांनी पुढे येत ‘सुमनांजली सुपर शॉपिंग मॉल’ उभारण्याचा निर्णय घेतला. महिलांच्या या व्यवसायाला ‘उमेद’ अभियानातून पाठबळ मिळालं. ‘उमेद’ बरोबर केलेल्या करारामुळे एचडीएफसी बँकेने सुपर शॉपीसाठी वित्त पुरवठा केला. तर काही भांडवल बचतगटांतील महिलांनी स्वत: उभारले. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते विजयादशमीच्या दिवशी 15 ऑक्टोबर, 2021 रोजी शॉपींग मॉलचे उद्घाटन करण्यात आले.

बचतगटांमधील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू तसेच शेतकऱ्यांनी सेंद्रिय पध्दतीने पिकवलेला भाजीपाला व फळभाज्या शॉपींग मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येतात. यामुळे बचत गटांसाठी छोटेसे विक्री केंद्र तयार झाले आहे. आज या सुपर शॉपी मध्ये महिला बचतगटांचे 25 लाखांच्या वर भागभांडवल गुंतलेले आहे. मागील चार महिन्यापासून या मॉलमधून महिलांना चांगले उत्पन्न मिळत आहे. संगमनेर पंचायत समिती सभापती सुनंदा जोर्वेकर यांच्या नेतृत्वाखाली मनीषा ढमाले, अश्विनी ढमाले, उषा ढमाले, योगिता सातपुते व मनीषा कोकणे या महिला या सुपर शॉपींग मॉलचे व्यवस्थापन उत्कृष्टपणे सांभाळत आहेत. नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या संकल्पनेमधुन ” स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ” या अभियाना अंतर्गत विभागात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत त्या अनुषंगाने अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारचे उपक्रम संपूर्ण अहमदनगर जिल्हाभर राबविण्याचे नियोजन आहे.

” अहमदनगर जिल्ह्यातील महिला बचतगटांना उमेद अभियानाच्या माध्यमातून मिळालेल्या कर्जामुळे त्यांना विविध गृहोद्योग करता येत आहेत. यातुन महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. यापुढे अहमदनगर जिल्ह्यात विविध शायकीय योजनांच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येईल.”

आशिष येरेकर,मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद, अहमदनगर
Tweet
Exit mobile version