कपाशीवरील रोगांची लक्षणे आणि त्यावरील उपाय

drip-irrigation-for-cotton-farming

जळगाव : कपाशीवर करपा, मर, कवडी, दहिया या रोगांसह पानावरील ठिपके, खोड व मूळकूज यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. या रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट येते. या रोगांचे नियंत्रण वेळची करणे आवश्यक असते. याबाबत तज्ञांनी शेतकर्‍यांना काय सल्ला दिला आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत. जिराईत कपाशीपेक्षा बागायती कपाशीचे रोगापासून जास्त नुकसान होते. कारण बागायती कपाशीमध्ये ओलाव्याचे प्रमाण जास्त असते. अशा वातावरणात रोगांचा प्रादुर्भाव आणि फैलाव झपाट्याने होतो. कपाशीवर बुरशी, जिवाणू, विषाणूमुळे रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतात. काहीवेळा आकस्मिक मर, मूलद्रव्यांच्या कमतरता दिसून येतात. रोगांमुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्याकरिता योग्य वेळेत उपाययोजना करणे आवश्यक आहे.

कवडी रोग :
हा रोग कोलेक्ट्रोटायकम इंडीकम या बुरशीमुळे होतो. अतिवृष्टी, थंड हवामानात आणि विशेषतः बागायती कपाशीवर या रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. यात रोगट बियाण्यापासून निघालेली रोपे कुजतात. पानावर तपकिरी काळ्या रंगाचे ठिपके दिसतात, अशी पाने गळतात. रोगाची लागण बोंडांना झाल्यास बोंडांवर काळपट करड्या रंगाचे व किंचित खोलगट चट्टे पडतात. तसेच बोंडे अर्धवट उमलतात. कापूस घट्ट चिकटून राहतो. कवडीसारख्या गुठळीत रूपांतरित होते. म्हणून याला कवडी रोग म्हणतात. असा कापूस आणि त्याचे बी निरुपयोगी होते.

रोगाचे नियंत्रण : रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बियाण्यास शिफारस केलेल्या रसायनांची प्रक्रिया करावी. यामुळे रोगाचा प्राथमिक प्रसार कमी करता येतो. बोंडे पक्व होण्याच्या काळात ढगाळ पावसाळी वातावरण असल्यास १२५० ग्रॅम कॉपर ऑक्सिक्‍लोराईड (०.२५ तीव्रतेचे) किंवा १२५० ग्रॅम झायनेब प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टर फवारावे. तसेच शेतातील पिकांचे रोगट अवशेष जाळून नष्ट करावेत.

दहिया रोग :
हा रोग रॅमुलेरिया ऍरिओला या बुरशीमुळे होते. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या रोगाची लक्षणे दिसतात. रोगट पानावर खालील बाजूने पांढरे, कोनाकृती ठिपके दिसतात. हे ठिपके पसरून झाडावर दही शिंपडल्यासारखे डाग दिसतात. यामुळे या रोगास दहिया हे नाव पडले आहे. या बुरशीच्या प्रादुर्भावाने पाने, फुले बोंडे गळतात दाट झाडीचा परिसर, नदी-नाल्यांकाठची खोलगट शेते, जेथे दमट वातावरण वरील काळात हमखास असते, अशा ठिकाणी रोग हमखास आढळतो.
रोगाचे नियंत्रण : ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत या रोगाच्या वाढीस पोषक परिस्थिती असते. प्रादुर्भाव दिसून येताच ३०० मेश गंधकाची भुकटी हेक्टरी २० किलो या प्रमाणात धुरळावी. धुरळणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी. भर उन्हात धुरळणी केल्यास अनिष्ट परिणाम होऊ शकतो. १० ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर ३०, ६० व ९० दिवसांनी फवारणी केल्यास रोगाचे नियंत्रण होते.

मर रोग :
हा रोग फ्युजारियम ऑक्सिस्पोरम फॉ. स्पे. वासइन्फेक्टम या जमिनीत वाढणार्‍या बुरशीमुळे होतो. हा रोग काळ्या जमिनीत आढळतो. देशी कपाशीचे वाण या रोगाला जास्त प्रमाणात बळी पडतात. हा रोग पिकाच्या वाढीच्या सर्व अवस्थेत होऊ शकतो. यात रोगट झाडाची पाने कोमेजतात, मलूल होतात, लोंबतात व पिवळी पडून वाळतात. रोगाला संपूर्ण झाड किंवा काही फांद्या बळी पडतात. रोगट झाडाचा आणि मुख्य मुळाचा भाग मधोमध उभा चिरल्यास आतील भागात काळपट पट्टे दिसतात. या रोगकारक बुरशीचा प्रसार प्रामुख्याने जमिनीतून होतो.
नियंत्रणाचे उपाय : रोग प्रतिबंधक वाणांची लागवड करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास एक ग्रॅम कार्बेन्डाझिम + तीन ग्रॅम थायरम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

पानावरील ठिपके/ अल्टरनेरिया करपा :
अल्टरनेरिया या बुरशीमुळे पानावर ठिपके किंवा मोठे चट्टे आढळून येतात. यात पानावर सुरवातीस गोलाकार, तपकिरी रंगाचे लहान ठिपके येतात. पुढे हे एकमेकांत मिसळून ते मोठे होतात. रोगाची लागण रोगग्रस्त झाडांचे अवशेष यामुळे होतो. रोगाचा प्रसार हवेतून होतो.
रोगाचे व्यवस्थापन : वेळीच रोगट व गळालेली पाने वेचून जाळून टाकावीत. पेरणीपूर्वी १० ग्रॅम सुडोमोनास फ्लुरोसन्सची प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. नियंत्रणासाठी २० मि.लि. सुडोमोनास फ्लुरोसन्स प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर ३०, ६० व ९० दिवसांनी फवारणी करावी. यामुळे जिवाणूजन्य करपा व ठिपके या दोन्ही रोगांचे नियंत्रण होते.

खोड व मूळकूज (रूट रॉट) :
हा रोग रायझोक्टोनिया या बटाटीकोला या बुरशीमुळे होतो. कपाशीच्या सर्व जाती या रोगास बळी पडतात. या रोगाची बुरशी जमिनीत वर्षानुवर्षे राहते. राज्यात या रोगाचे प्रमाण कमी आहे. या रोगाचा प्रादुर्भाव जून, जुलै महिन्यात दिसून येतो. तापमानाच्या तीव्र बदलामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. अशी झाडे एकाएकी कोमेजून वाळतात, मुळे कोमेजतात. साल चटकन निघून येते. सालीच्या खालील मुळाचा व खोडाचा भाग तपकिरी व काळ्या रंगाचा होतो. सालीच्या आतील भागात रोगकारक बुरशीच्या काळ्या रंगाच्या लहान लहान गोळ्या दिसतात.
रोग व्यवस्थापन : पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरमची बीजप्रक्रिया करावी. कपाशीत शेंगवर्गीय आणि ज्वारी यासारखी मिश्र पिके घ्यावीत. कपाशीची पेरणी साधारणपणे १५ जूननंतर करावी. नियंत्रणासाठी १० ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. त्यामुळे माती जंतूविरहित होऊन रोगनियंत्रणास मदत होते.

पानावरील कोनाकार करपा/ ठिपके :
हा रोग झॅन्थोमोनास ऑक्सेनोपोडीस व्ही. मालव्हेसीरम या जिवाणूमुळे होतो. शेतात पडलेल्या रोगट पाला, पाचोळा, पर्‍हाट्या, रोगट बोंडे गोळा करून जाळावीत. सुरवातीस रोगट झाडे त्वरित नष्ट करावीत. पिकाची फेरपालट, उशिरा लागवड, लवकर विरळणी, चांगली नांगरणी हे उपाय रोग कमी करण्यास मदत करतात.
नियंत्रण : निरोगी पिकापासून निवडलेले बियाणे पेरणीस वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास शिफारस केलेल्या रसायनांची प्रक्रिया करावी. पिकावर रोग दिसून येताच ३० ग्रॅम कॉपर ऑक्सिक्‍लोराईड प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने गरजेनुसार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार फवारणी करावी.

टोबॅको स्ट्रीक व्हायरस
हा विषाणूजन्य रोग बीटी कपाशीत तीव्र प्रमाणात येतो. कपाशीच्या पानावर पिवळसर किंवा करपलेल्या रेघा येऊन पानाचा आकार कमी होतो. पाने व खोडावर करपलेल्या रेषा येऊन त्या वाढत जातात. त्यामुळे झाड खुजे होते. हा विषाणू कापूस या पिकाव्यतिरिक्त सूर्यफूल, भुईमूग आणि सोयाबीन या पिकांवर येतो.
नियंत्रण : या रोगाच्या नियंत्रणासाठी निरोगी बियाण्याचा वापर करावा. फुलकिडीद्वारे होणारा प्रसार थांबविण्यासाठी शिफारस केलेल्या कीटकनाशकाच्या तीन ते चार फवारण्या घ्याव्यात.

विषाणूमुळे पाने वाकणे :
रोगाचा प्रादुर्भाव फक्त अमेरिकन हीरसुटम व बारबडन्स कपाशीवर आढळून येतो. देशी कापूस या रोगास बळी पडत नाही. सुरवातीच्या काळात या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पिकाची वाढ होत नाही. फुले आणि बोंडे लागत नाहीत. झाड खुरटे राहून पूर्ण नष्ट होते. रोगाच्या सुरवातीच्या काळात जर रोगग्रस्त झाडाची पाने प्रकाशाच्या विरुद्ध बघितली तर पानामध्ये बारीक व गडद हिरव्या रंगाचे ठिपके दिसतात. पाने वर किंवा खाली वाकतात. पानाच्या खालील बाजूस शिरा मोठ्या व वर आलेल्या गडद हिरव्या रंगाच्या असतात.

आकस्मिक मर :
हा रोग बहुधा संकरित वाणावर जास्त येतो. यात रोगट झाडावरील पानाची किंवा तजेलपणा नाहीसा होऊन पाने मलूल होतात. पानातील ताठपणा कमी होतो. झाडे संथगतीने सुकू लागतात. पाने, फुले व बोंडाची गळ होते. अपरिपक्व बोंडे अवेळी सुकतात. परंतु अशा झाडाची मुळे निरोगी व सशक्त असतात. रोगग्रस्त झाडाचे खोड व मूळ कुजत नाही. रोगग्रस्त झाडांना कालांतराने नवीन फूल येते.
नियंत्रण : सुकू लागलेल्या झाडास बारा तासांच्या आत १०० ग्रॅम युरिया अधिक ३०० ग्रॅम सुपर फॉस्फेट अधिक १० लिटर पाणी या प्रमाणातील द्रावणाची प्रत्येक झाडास हजार मि.लि. या प्रमाणात आळवणी करावी.

(महाराष्ट्र शासन कृषि विभाग)

Exit mobile version