धान्याची सुरक्षित साठवण करण्यासाठी अशी घ्या काळजी अन्यथा होईल मोठे नुकसान

dhanya

कोल्हापूर : हंगाम संपल्यानंतर कापणीनंतर धान्याची साठवणूक हे देखील शेतकर्‍यांपुढे मोठे आव्हान असते. धान्य साठवणूकीदरम्यान लहानशी जरी चुक झाली तर त्याची मोठी किंमत शेतकर्‍याला चुकवावी लागते. याकरीचा नुकसान टाळण्यासाठी योग्य पध्दतीने धान्याची सुरक्षित साठवणूक करण्याची आवश्यकता असते. साठविलेल्या धन्याला कीड लागण्याची कारणे कोणती असतात व त्यावर कोणते प्रतिबंधक उपाययोजना करता येवू शकतात, याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

साठविलेल्या धन्याला कीड लागण्याची कारणे:
कडधान्याचा भुंगेरा, सोंड किडा आणि धान्याचा पतंग यांचा प्रादुर्भाव शेतात धान्य पिकात असतानाच सुरु होतो.
पिकलेल्या दाण्यावर ते अंडी घालतात आणि अशा रीतीने उपद्रव शेतातून साठवणीत येतो.
साठवणीच्या जागेत चिरा, फटी इ. मध्ये किडी राहतात आणि नवीन धान्य घरात आले कि त्यात त्यांचा शिरकाव होतो.
साठवणुकीची साधने जसे पोते कणग्या इ. मध्ये किडी वास्तव्य करतात.
वाहतुकीची साधने, बैलगाड्या, ट्रक रेल्वे वॅगन इ. मध्ये देखील किडी जाळी करून राहतात.

प्रतिबंधक उपाय:
१) साठवणुकीसाठी आधुनिक व सुधारित कोठ्या वापराव्यात.
२) धान्यामध्ये कडूलिंबाच्या ओल्या पानांचा वापर करावा.
३) धान्याची दर १५ दिवसांनी तपासणी करावी.
४) धान्याच्या ओलाव्यावर किंडीपासून होणारे नुकसान अवलंबून असते. म्हणून धान्य चांगले वाळवून आद्रतेचे प्रमाण ८ टक्क्यांपर्यंत खाली आणावे. त्यासाठी धान्य उन्हात चांगले वाळवावे.
५) धान्याची गोदाम आणि साधने नेहमी स्वच्छ ठेवावीत. जुनी पोती वापरायची झाल्यास ती कडक उन्हात वाळवून स्वच्छ करावी.
६) धान्य साठवणुकीची जागा स्वच्छ, कोरडी असावी, असलेल्या भेगा, छिद्रे लिंपून बंद करावीत.
७) धान्य पोत्यात साठवतेवेळी जमिनीवर लाकडी फळ्या, बांबू, चटई किंवा पॉलीथीन पेपरचा वापर करावा त्यामुळे जमिनीतील ओलावा पोत्याला लागणार नाही.
८) पोत्यांची थप्पी भिंतीपासून ६० सेंमी अंतरावर असावी. त्यामुळे भिंतीचा ओलावा लागणार नाही व हवा खेळती राहील.
९) शक्यतो हवाबंद साठवणूक करावी. त्यासाठी पत्र्याच्या कोठ्या किंवा सिमेंट विटांच्या सुधारित कोठ्यांचा वापर करावा.
१०) साठवणीपूर्वी किंवा साठवणीच्या काळात शक्य तितक्या वेळेस किडलेले खराब दाणे चाळणी व उधळणीद्वारे वेगळे करून घ्यावे.

कीटकनाशकांचा वापर:
१) धान्य साठवण्यापूर्वी पोती, कणग्या, भिंती, वाहतुकीची साधने यांच्यावर कीटकनाशकाची फवारणी करावी.
२) यासाठी मॅलॅथीऑन ५० टक्के प्रवाही १ भाग – १०० भाग पाणी असे द्रावण तयार करावे. १०० चौ मी क्षेत्रासाठी ३ लिटर द्रावण पुरेसे आहे.
३) साठवणीनंतर दर ३ आठवड्यांनी थप्पी आणि कणणग्यावर बाहेरून नियमित फवारावे.
४) धुरीजन्य कीटकनाशकांचा (इथीलीन डायब्रोमाइड) वापर करावा.
५) उंदराच्या नियंत्रणासाठी विषारी आमिषाचा वापर करावा.

Exit mobile version