कृषि यंत्रे आणि अवजारांची अशी राखा निगा, अन्यथा होवू शकते मोठे नुकसान

Launch of Agricultural Tools Bank

पुणे : कमी जागेतून व कमी वेळेत जास्तीतजास्त पीक काढून चांगला नफा मिळविण्याकरिता शेतीचे यांत्रिकीकरण होणे महत्त्वपूर्ण आहे. यंत्रे आणि अवजारांच्या वापरामुळे शेतकर्‍यांचे कष्ट कमी होतात. यामुळे शेतीच्या यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही. ही यंत्रे महाग असल्याने त्यांचे देखभाल व दुरुस्ती योग्य रितीने होण्याची आवश्यकता असते. आज आपण शेतातील यंत्रे व अवजारांची निगा कशी राखावी, याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

कल्टीव्हेटर
१. पात्यांना गंजप्रतिबंधक रसायन किंवा खराब झालेले इंजीन ऑईल लावावे तसेच इतर भागाला ऑईल पेंट द्यावा.
२. वापरण्यापूर्वी सर्व नटबोल्ट्स तपासून घ्यावेत व आवश्यकतेनुसार घट्ट करावेत.
३. वापरानंतर यंत्र शेडमध्ये ठेवावे. तसेच पावसापासून यंत्राचे संरक्षण करावे, ज्यामुळे यंत्राचे भाग गंजणार नाहीत.
४. पाते डबल पॉइंट असल्यास व पाते घासले गेलेले असल्यास पुढील वापरासाठी त्याचे टोक वर उलटवून बसवण्यात यावे.

रोटाव्हेटर
१. रोटाव्हेटरच्या सर्व फिरणार्‍या भागांना वंगण द्यावे व सर्व ग्रिसींग पॉइंटस्ना ग्रीस लावावे.
२. गिअर बॉक्समध्ये वंगण तेलाची पातळी तपासावी, गिअरबॉक्समधील सर्व वंगण तेल बाहेर काढावे व स्वच्छ प्रमाणित ग्रेडच्या तेलाने गिअर बॉक्स योग्य पातळीपर्यंत भरावा.
३. पाते (ब्लेड) ढिल्या, वाकलेल्या अथवा मोडलेल्या नाहीत याची खात्री करण्यासाठी रोटाव्हेटरची तपासणी करावी.
४. साईड कव्हर काढून साईड चेन – स्प्रॉकेट अथवा गिअरमधील सर्व भागांची स्थिती तपासावी व त्यांना वंगण द्यावे.

पल्टी नांगर
१. नांगर जर फार काळ वापरवयाचा नसल्यास फाळाच्या आणि मोल्ड बोर्डच्या पृष्ठभागावर हलके ग्रीस किंवा खराब वंगणतेल लावावे म्हणजे नांगराचे गंजण्यापासून संरक्षण होईल.
२. नांगर वापरण्यापूर्वी सर्व नटबोल्ट घट्ट बसवावेत.
३. ग्रीस निपल्स स्वच्छ करावेत व सर्व ग्रीसींग पार्टस्ना ग्रीस लावावे.
४. धातूचे सर्व भाग रंगवावेत व सुगीपश्‍चात नांगर शेडमध्ये ठेवावा.

तव्याचा नांगर
१. तव्यांच्या कडा बोथट झाल्या असल्यास धारदार करून घ्याव्यात. तव्यांचा कोन योग्य प्रमाणात ठेवल्यास तव्यांच्या कडा धारदार करण्याची गरज नसते.
२. चालकास ट्रॅक्टरचे स्टेअरिंग जड जात असेलतर नांगराच्या सर्व जुळवण्या तपासून पहाव्यात व सर्व बेअरिंग्जना नियमित ग्रीस द्यावे.
३. तव्यांचे सर्व नटबोल्ट वरचेवर तपासून घट्ट करावेत.
४. ट्रॅक्टरच्या पुढील चाकांवर पुरेसे वजन (बॅलेन्सिंग) द्यावे, जेणेकरून ट्रॅक्टरचा समतोल राखण्यास मदत होते.

पेरणी व टोकण यंत्र
१. प्रमाणित बियांची मात्रा मिळविण्यासाठी बियाणे वितरण यंत्रणेचे समायोजन (कॅलिब्रेशन) करावे.
२. बियांची प्रमाणित खोलीवर पेरणी होते का नाही, तसेच बियांची पेरणी झाल्यानंतर त्याच्यावर मातीची हलकी पसरण होईल याची काळजी घ्यावी.
३. पेरणी यंत्राचे काम झाल्यानंतर गती देण्याच्या कामात येणार्‍या चेनला मोकळे करून त्यांची हलक्या तेलाच्या डब्यात साठवणूक करावी.
४. यंत्र सुरू असताना गती मिळणार्‍या सर्व भागांवर दररोज ग्रिसींग करावे व दररोज सर्व नट व बोल्ट काम झाल्यानंतर आवळावे.

मळणी यंत्रे
१. मळणी यंत्राच्या सिलिंडर आणि कॉन्केव्ह या दोन्ही भागातील अंतर योग्य असल्याची खात्री करून घ्यावी.
२. मळणी यंत्र ठेवताना शक्यतो वार्‍याच्या दिशेला भुसा बाहेर पडेल असे ठेवावे. मळणी करण्याचे पीक जास्त वाळलेले अथवा जास्त ओले असू नये.
३. मळणी यंत्राच्या सर्व बेअरिंग्जना आणि फिरणार्‍या भागाला योग्य ते वंगण घालावे.
४. मळणी यंत्राचे काम पूर्ण झाल्यानंतर यंत्र स्वच्छ ठेवावे. ढिले झालेले नट बोल्टस् घट्ट करावेत. आवश्यक त्या भागांना वंगण घालावे. मळणी यंत्र सावलीत ठेवावे.

कडबाकुट्टी यंत्र
१. यंत्राची पाती (ब्लेड) व्यवस्थित लावावीत म्हणजे यंत्राची दाढ व पाती (ब्लेड) मधील अंतर योग्य राखावे व पात्यांची धार चांगली असावी.
२. यंत्राच्या कटिंग व्हीलचा व पुलीचा बोल्ट काढून मशीनचे चाक हाताने फिरवून खात्री करावी.
३. कमी वैरण घालून म्हणजेच साधारण एक पेढींपेक्षा कमी वैरण घालून यंत्र चालविल्यास वैरण व्हीलच्या मध्यभागी व दोन्ही बाजूला गुंडाळून यंत्रावर लोड येतो.
४. यंत्राला लागणारे योग्य व्होल्टेज तपासूनच यंत्र सुरू करावे. यंत्र चालू केल्यानंतर मध्येच वीज गेल्यास स्विच बंद करून मशीनचे चाक उलट्या गतीने फिरवून घ्यावे.

Exit mobile version