पुणे : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. अधुनिक तंत्रज्ञानामुळे हवामानाचा अंदाज वर्तविण्यात येत असला तरी क्षेत्रनिहाय अचूक अंदाज मिळत नसल्याचे शेतकर्याचे नुकसान होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शेती आणि शेतकर्यांच्या अशा समस्यांवर उपाय शोधला आहे. इस्रोने भारतीय शेतीसाठी दोन समर्पित उपग्रह स्थापन करण्याचा प्रस्ताव कृषी मंत्रालयाला दिला आहे. या कार्यक्रमाला ’भारतीय कृषी उपग्रह कार्यक्रम’ असे नाव देण्यात आले आहे.
ग्रामीण भागात आजही हवामानावर आधारित शेती केली जाते. याठिकाणी हवामान चांगले राहिल्यास शेतकर्यांना चांगले पीक येण्याची आशा आहे, मात्र हवामानाचा अचूक अंदाज न आल्याने दर हंगामात शेतकर्यांचे नुकसान होत असते. यावर्षी शेतीच्या नुकसानीला हवामान कारणीभूत असून, त्यामुळे देशातील काही भागात दुष्काळ तर काही ठिकाणी पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशाच समस्या पाहता आता इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी कृषी क्षेत्रासाठी दोन उपग्रह समर्पित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
हवामान बदलाचा सर्वाधिक फटका कृषी क्षेत्राला बसला आहे. अशा स्थितीत उपग्रहावर आधारित कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकर्यांना वेळेवर हवामान अंदाज, पीक उत्पादन अंदाज, सिंचन, मातीची आकडेवारी आणि दुष्काळाशी संबंधित माहिती मिळू शकेल. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शेतकर्यांना आपत्तीपूर्वी व्यवस्थापन करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकेल. इस्रोच्या प्रस्तावित ’भारतीय कृषी उपग्रह कार्यक्रमा’अंतर्गत उपग्रहांद्वारे हवामानातील प्रत्येक हालचाली आणि बदलावर लक्ष ठेवले जाईल. अशा परिस्थितीत वेळेआधीच अलर्ट जारी करून शेतीत मदत व बचाव कार्य करणे सोपे होईल.
मीडिया रिपोर्टनुसार, या उपग्रहांची मालकी देखील कृषी मंत्रालयाकडे राहील, जेणेकरून कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व गरजा पूर्ण करता येतील. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी इंजिनियर्स कॉन्क्लेव्ह २०२२ च्या निमित्ताने केंद्रीय कृषी मंत्रालयासोबत इंडिया अॅग्रीकल्चर सॅटेलाइट प्रोग्रामवर काम करण्याचा प्रस्ताव दिला आहे. श्री. सोमनाथ म्हणाले की, पिकाचे उत्पादन केवळ एका आठवड्यात साध्य होत नाही, तर या कामासाठी अनेक महिने लागतात. अशा परिस्थितीत शेतकर्यांवर सतत लक्ष ठेवण्याची गरज आहे. यासाठी आपले उपग्रह पुरेसे नाहीत, परंतु चांगल्या निरीक्षणासाठी आणि तांत्रिक सहाय्यासाठी अतिरिक्त उपग्रह स्थापित करण्याची गरज आहे.