कापूस वेचणी करतांना अशी घ्या काळजी, होईल मोठा फायदा

cotton

जळगाव : खरिप हंगाम संपेपर्यंत पावसाची राहिलेली अनियमितता व परतीच्या पावसाने झोडपल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचा मोठा फटका कापूस उत्पादक शेतकर्‍यांना बसला आहे. हंगामात कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता हंगामच्या अंतिम टप्प्यात कापसाची वेचणी सुरु असली तरी शेतकर्‍यांच्या हाती फारसे काही लागणार नाही, अशी काहीशी स्थिती आहे. अशा परिस्थितीत कापासची योग्य पध्दतीने वेचणी केल्यास काहीप्रमाणात नुकसान भरुन काढता येवू शकते.

कापसाची प्रत राखण्याकरिता वेचणी करतांना काळजी घेणे आवश्यक आहे. वेचणी सुरु झाल्यापासून साधारणतः ३ ते ४ वेचणीत बराचसा कापूस गोळा होतो. आपल्याकडे वेचणी करताना काळजी न घेतल्यामुळे ३० ते ३५ टक्के पालापाचोळा व इतर केरकचरा रुडमध्ये आढळतो. जास्त दिवस कापूस झाडावर राहिल्यास त्याला पालापाचोळा, हवेतील धुळीचे कण, बोंड जमिनीवर पडल्यास मातीचे कण चिकटतात व त्यामुळे कापसाची प्रत खराब होते.

कापूस वेचणी करतांना अशी घ्या काळजी
१) वेचणी ही सकाळी किंवा दुपारी उशिराने करावी, जेणेकरून कापसाला पालापाचोळा चिकटून येणार नाही, बोंडे वेचतांना पालापाचोळा चिकटल्यास त्याचवेळी काढावे व स्वच्छ कापूस गोळा करावा.
२) अपरिपक्व व अर्धवट उमललेल्या बोंडातील कापसात पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अशा बोंडातील कापूस वेचून तसाच साठविल्यास रुईला पिवळसरपणा येतो व कापसाची प्रत खालावते. शिवाय अशा कापसाच्या सरकीचे आवरण टणक नसल्यामुळे गलाई करतांना सरकी फुटते व ती रुइमध्ये मिसळते व रुईची प्रत खराब होते.
३) परिपक्व व पूर्ण फुटलेल्या बोंडातील कापसाची प्रत चांगली असते आणि या कापसापासून मिळणार्‍या रुई आणि धाग्याची प्रत उच्च दर्जाची असते. म्हणूनच कापसाच्या तसेच रुईच्या दर्जेदार उत्पादनाकरीता वेचणी करतांना पूर्णत: परिपक्व आणि पूर्ण उमललेल्या बोंडातील कापूस वेचणी करावी.

Exit mobile version