भेंडी लागवडीसाठी या तंत्रांचा करा वापर, होईल बंपर उत्पादन

bhendi ladies finger

नाशिक : आठवड्यातून किमान एकवेळ तरी जेवणात भेंडीची भाजी येतेच. भेंडीची भाजी जितकी चविष्ट तितकी आरोग्यदायी देखील असते. भेंडीमध्ये कॅल्शियम व आयोडिन ही खनिजे व ‘अ’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. भेंडी लागवडीतून शेतकरी कमी कालावधीत चांगला नफा कमवू लागले आहेत. मात्र हे प्रत्येकालाच शक्य होत नाही. यामुळे तंत्रशुध्द पध्दतीने भेंडीची लागवड कशी करावी? याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

भेंडीची लागवड खरीप व उन्हाळी हंगामात करता येते. या पिकास उष्ण हवामान चांगले मानवते. भेंडी पिकाची लागवड सरी-वरंबा पध्दतीने करणे फायदेशीर असते. लागवडीच्या वेळी बियाणे सरीच्या दोन्ही बाजूस म्हणजेच ३० बाय १५ सें.मी. अंतरावर टोकण कराने. लागवडीसाठी प्रतिहेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे पुरेसे होते. उन्हाळी हंगामातील लागवड १५ जानेवारी ते १५ फेब्रुबारीच्या दरम्यान तर खरीप हंगामातील लागवड १५ जुन ते १५ जुलै च्या दरम्यान करावी. भेंडी लागवडीपूर्वी बी एक रात्र पाण्यात भिजबून लावल्यास भेंडी बियांची उगवण चांगली होते. लागवडीपूर्वी ३ ग्रॅम थायरम अथवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रती किलो बियाण्यास चोळून घ्यावे. यामुळे भेंडीचे मर रोगापासून नियंत्रण होते. त्यानंतर अँझोटोबॅक्टर व स्फूरद विरघळविणारे जिवाणूसंवर्धन २५ ग्रॅम/कि. बियाण्यास चोळावे.

भेंडीच्या पिकास भरखते व वरखते यांची योग्य मात्रा दिल्यास उत्पादन चांगळे मिळते. सेंद्रिय खताचा जास्त उपयोग केल्यास फळांचा हिरवा रंग वाढून भेंडीचा टिकावूपणा वाढतो. रासायनिक खतांची मात्रा सर्वसाधारणपणे प्रती हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फूरद ब ५० किलो पालाश देण्याची शिफारस आहे. रासायनिक खतांचा वापर योग्य प्रमाणात असावा. जास्त प्रमाणात नत्र खतांची मात्रा झाल्यास भेंडीवर मावा, तुडतुडे, फुलेकिडी, पांढरी माशी या रस शोषणार्‍या किडींचा प्रादुर्भाव वाढतो.

भेंडी पिकावर मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फळ पोखरणारी अळी वगैरे किडी आढळून येतात. तसेच विषाणूजन्य यलो व्हेन मोझॅक (केवडा किंवा हळ्या) बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळतो. पीक उगवताच त्याभोवती थायमेट किंवा फ्युरोडॉन १० जी बुंध्याजवळ टाकावे, म्हणजे ३० ते ४० दिवस किडी पासून संरक्षण होते किंवा थायोमेथोक्झाम २५ टक्के डब्ल्युजी ५ ग्रॅम १५ लीटर पाण्यात मिसळून दर १५ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. फळ पोखरणार्‍या अळीच्या नियंत्रणासाठी इक्यॅलक्स २० मि.ली. फवारणी करावी. भेंडीवरील भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी प्रती १० ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी. पांढर्‍या माशीच्या नियंत्रणासाठी होस्टॅथियॉन २० मि.ली. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भेंडी तोडणी सुरु झाल्यावर मात्र कडूनिंबापासून बनविलेली निमार्क निंबपावडर या किडनाशकांची फवारणी करावी. भेंडी लागवडीनंतर ४८ ते ५२ दिवसात पहिली तोडणी सुरु होते. भेंडीची काढणी एक दिवसाआड करावी.

Exit mobile version