सांगा कशी करायची शेती? कांद्याचा एकरी खर्च ६० हजार तर उत्पन्न ३० हजार

onion

नाशिक : गेल्या काही दिवसांमध्ये कांद्याचे दर कमालीचे घसरले आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी कांदा फुकट वाटला, रस्त्यावर फेकून दिला, अशा अनेक बातम्या वाचण्यास मिळत आहेत. कांदा उत्पादक शेतकरी इतका अडचणीत कसा आला आहे? याचे गणित समजून घेणे महत्वाचे आहे.

गेल्यावर्षी कांद्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकर्‍यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली. त्यामुळे यावर्षी कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. मात्र येथेच शेतकर्‍यांचे गणित फसले. बाजारात मागणीपेक्षा जास्त पुरवठा होत असल्याने कांद्याचे दर कमालीचे घसरले आहेत. बाजारात किंवा रस्त्यांच्या कडेला शेतकरी कांद्याच्या गोण्या घेवून विक्रीसाठी बसत असल्याचे चित्र अनेक गावांमध्ये दिसून येत आहे. शेतकर्‍यांवर स्वत: विक्री करण्याची वेळ येण्यामागे कारण आहे बाजारभावाचे! तीन महिन्यांपूर्वी ३० ते ४० रुपये किलो दराने कांदा विकला जात होता. परंतु दोन आठवड्यापासून बाजारात कांद्याला ५०० ते ७०० रुपये क्विंटल दर मिळत आहे. किरकोळ बाजारात आठ ते दहा रुपये दर आहे. यामुळे दोन पैसे जास्त सुटतील या आशेने शेतकरी स्वत: कांदा विक्री करतांना दिसत आहे.

उत्पादन खर्च जास्त उत्पन्न कमी
कांद्याला एकरी ६० ते ६५ हजार रुपये उत्पादन खर्च लागतो. यात बियाणे १० हजार, पेरणी १० हजार, निंदणी ५ हजार, फवारणी ८ हजार, रासायनिक खते १५ हजार, काढणी १० हजार, भराई मजुरी २ हजार, वाहतूक ३ हजार असा एकूण ६० ते ६५ हजार खर्च येतो. तर सध्या मिळणारा भाव पाहता शेतकर्‍यांच्या हातात केवळ ३५ हजार रुपये येतात. त्यामुळे एकरी शेतकर्‍यांना ३० हजार रुपये तोटा सहन करावा लागत आहे.

सरकारचे धोरण चुकीचे
कांदा लागवडीपूर्वीच दोन वेळेस पावसामुळे रोपवाटिकेचे नुकसान झाल्याने महागडे कांदा बियाणे घेऊन तिसर्‍यांदा रोपवाटिका तयार करावी लागली. त्यात पुन्हा अवकाळी पाऊस, करपाजन्य रोप, भारनियमन असल्याने अपुरे सिंचन यामुळे ५० टक्के उत्पादकता घटली. एकरी ६० हजार रुपये खर्च करून पुरेसे उत्पन्न हाती येत नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसाळी कांद्याचा साठाही संपला नसताना नवीन उन्हाळी कांद्याची आवक सुरू झाली. त्यामुळे कांद्याचे भाव पूर्णपणे कोसळले. केंद्राने स्पष्ट आराखडा काढावा, कांदा विक्रीबाबत नियोजन करून धोरण ठरवावे, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

Exit mobile version