रशिया-युक्रेन युद्धाचा गव्हावरही परिणाम

wheat

नागपूर : रशिया आणि युक्रेन युद्धाचा गव्हाच्या भाववाढीवर परिणाम झाल्याने, पंधरा दिवसांमध्ये गव्हाचे भाव क्विंटलमागे ३५० ते ४०० रुपयांनी वाढले आहेत. रशिया जगातील मोठा गहू उत्पादक देश आहे तर युक्रेनचा गहू निर्यातीमध्ये तिसरा क्रमांक लागतो. मात्र, युद्धामुळे अनेक देशात गव्हाची होणारी निर्यात थांबली आहे.

भारतातून सध्या मोठ्या प्रमाणावर गहू निर्यात होत आहे. त्यामुळे गव्हाच्या भावात वाढ झाली आहे. सध्या गव्हाच्या काढणीचा हंगाम सुरू आहे. सर्वसाधारणपणे जेव्हा बाजारात नवे पीक येते, तेव्हा भाव स्वस्त होतात. परंतु, मागणीमुळे गव्हाचे भाव वाढले आहेत. येणाऱ्या काळात गव्हाचे भाव आणखीन वाढतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे सध्या तरी शेतकरी नवा गहू बाजारात आणत नाहीय.

बाजारात खानदेश, मध्यप्रदेश, गुजरात या भागातून गव्हाची आवक होते. मात्र, यंदा नवीन मालाची आवक कमी आहे. बाजारात जुन्या मालाचा साठा कमी आहे. परंतु सध्या बाजारात गव्हाला मागणी आहे. त्यामुळे भाववाढ झाली आहे. भारत हा जगातील दुसरा सर्वांत मोठा गहू उत्पादक देश आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर गव्हाची निर्यात वाढून गव्हाचे दर आणखी वाढतील, असे धान्याचे व्यापाऱयांनी सांगितले.

परदेशातून मागणी वाढली

रशिया-युक्रेन युद्धामुळे भारताच्या गव्हाला परदेशातून मोठी मागणी सुरू झाली आहे. खरे तर रशिया आणि युक्रेन हे जगातील सर्वात मोठे गहू निर्यातदार आहेत. मात्र युद्धामुळे गव्हाच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भारताकडे खरेदीदारांची चौकशी वाढली आहे.  जागतिक बाजारपेठेत गव्हाची उपलब्धता मर्यादित आहे आणि भारत या संधीचा सहज फायदा घेऊ शकतो. बांगलादेश, फिलिपिन्स, दक्षिण कोरिया, श्रीलंका, यूएई, लेबनॉन हे देश भारताचा गहू खरेदी करतात.

व्यापऱ्यांकडून लूट सुरू

युद्धाच्या नावाने व्यापाऱ्यांकडून लूट सुरू असल्याचा आरोप किराणा दुकानांमध्ये ग्राहक करत आहेत. कारण, गहू, तेलाबरोबरच मसाल्याचे पदार्थच्या किंमती अचानक महाग झाल्यानं लोक हैराण झाले आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम जगभरात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिसून येत असताना महाराष्ट्रात मात्र, जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीने लोकांना हैराण केलं आहे. देशभरात तेल आणि गव्हाची भाववाढ सुरू झाली आहे. त्यात साखर, तेल, गहू, आटा, रवा, मैदा, लाल मिरची आणि मसाल्याचे दर अचानक वर गेले आहेत. रशिया-युक्रेन युद्धाच्या नावाने व्यापाऱ्यांकडून लूट सुरू असल्याचा आरोप ग्राहक करत आहेत.

Exit mobile version