हरभरा उत्पादक शेतकर्‍यांनी काय पाप केलयं? राज्य आणि केंद्राच्या धोरणात भरडतोय शेतकरी

Gram harbhara

नागपूर : यंदा निसर्गाच्या लहरीपणासोबतच शासनाचा लहरीपणाही शेतकर्‍यांच्या मुळावर उठला आहे. याचा सर्वाधिक फटका हरभरा उत्पादक शेतकर्‍यांना बसत आहे. मुदतीपुर्वीच बंद झालेली खरेदी केंद्र अद्यापही सुरु झालेली नाहीत. त्यामुळे हमीभाव तर नाही पण बाजारपेठेत मिळेल त्या दराने हरभरा विक्रीची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. एवढेच नाहीतर ज्या शेतकर्‍यांचा हरभरा खरेदी केंद्रावर घेण्यात आला त्याचे चुकारेही अद्यापर्यंत मिळालेले नाहीत.

हरभरा खरेदी करण्यापूर्वी त्याची केंद्रावर नोंदणी करावी लागते. यंदा बाजारभावापेक्षा खरेदी केंद्रावर अधिकचा दर असल्याने शेतकर्‍यांनी केंद्राकडे मोर्चा वळवला. सातबारा, आठ ‘अ’, आधारकार्ड, बँक पासबूक आदी कागदपत्रे जमा करून नोंदणी केली. मात्र, २९ मे रोजी बंद होणारी खरेदी केंद्र ही २३ मे लाच बंद झाल्याने शेतकर्‍यांच्या हरभर्‍याची खरेदी रखडली आहे. आता केंद्र बंद होऊन महिना उलटला त्यामुळे हरभर्‍याचे करावे काय असा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला आहे.

खरेदी केंद्राच्या माध्यमातून नाफेड किती मालाची खरेदी करणार हे आगोदरच स्पष्ट झालेले असते. असे असताना केंद्र सुरु होताच नोंदणीला सुरवात झाली होती. शिवाय यंदा हरभर्‍याचे उत्पादनही वाढेल अन् खरेदी केंद्रांची सख्याही. त्यामुळे अवघ्या दिवसांमध्येच नाफेडने हरभरा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण केले. त्यामुळे राज्यात २९ मे पर्यंत सुरु राहणारे खरेदी केंद्र हे २३ मे रोजीच बंद झाली. अचानाक झालेल्या निर्णयामुळे दोन दिवस हरभरा विक्रीसाठी आलेली वाहने ही केंद्राबाहेरच होती. मात्र, हरभरा खरेदीचे उद्दिष्टपूर्ण झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे खरेदी केंद्र चालकांनी सांगितले आहे.

Exit mobile version