लातूर : हंगामाच्या अंतिम टप्प्यात सोयाबीनच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. जानेवारीत ७ हजार ३०० पोहचलेले सोयाबीन आता थेट ६ हजार ३०० रुपये क्विंटलप्रमाणे विक्री करण्याची नामुष्की ओढावली आहे. तब्बल ६ महिने सोयाबीन साठवून ठेऊनही क्विंटल मागे एक हजार रुपयांचे नुकसान सोसावे लागत असल्याने शेतकर्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सोयाबीनला ७ हजार ३०० असा दर होता. मात्र कापसाप्रमाणे सोयाबीनचेही भाव वााढतील अशी आशा शेतकर्यांना होती. यामुळे विक्री करण्याऐवजी साठवण करण्यावर अनेक शेतकर्यांनी भर दिला. त्याचेच आता परिणाम भोगावे लागत आहेत. बाजारात मागणी कमी आणि पुरवठा जास्त असे गणित तयार झाल्याने सोयाबीनचे दर कमालीचे घसरले आहेत.
हंगामाच्या अंतिम टप्प्यात का होईना सोयाबीनच्या मागणीत वाढ होऊन अपेक्षित दर मिळेल असा आशावाद प्रत्येक शेतकर्याला होता. पण सोयाबीनची मागणीच घटली आहे. प्रक्रिया उद्योगवाले देखील लागेल तेवढ्याच मालाची खरेदी करतात. शिवाय साठवणूकीवर शासनाकडून निर्बंधही आहेत. असा प्रतिकूल परस्थितीमुळे सोयाबीनच्या दरात घट होत आहे.
राज्यात पावसाने हजेरी लावल्याने खरीप पेरणीच्या कामांना आता गती आली आहे. शिवाय पेरणीसाठी आवश्यक असलेले बियाणे, खते त्याच बरोबर पेरणी आणि फवारणीचा खर्च पाहता एकरी ८ ते १० हजार खर्च आहे. खरिपाची पेरणी करण्यासाठीच शेतकर्यांना सोयाबीन विक्री करावे लागत आहे. मात्र नेमक्या त्याचवेळी सोयाबीनचे दर निच्चांकी पातळीवर आले आहेत.