हरभर्‍याचे दर घसणार? खरेदी केंद्र बंद झाल्यामुळे बदलणार बाजारपेठेचे गणित

Gram harbhara

औरंगाबाद : यंदाच्या हंगामात हरभरा खरेदी-विक्रीमध्ये मोठे चढउतार पहायला मिळत आहेत. हमी भाव केंद्रामुळे दोन महिन्यांपासून हरभरा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळत असला तरी आता पुन्हा एकदा ही केंद्रे बंद झाल्याने हरभर्‍याच्या बाजारपेठेचे गणित बदणार आहे.

हरभरा खरेदी केंद्रावर नोंदणी आणि विक्री अशी प्रक्रिया पार पाडावी लागते. केंद्रावर हरभर्‍याला ५ हजार २३० असा दर ठरवून दिला होता. तर बाजारपेठेत ४ हजार ६०० पर्यंत दर आहे. खुल्या बाजारपेठेपेक्षा खरेदी केंद्रावर हरभर्‍याला जवळपास १ हजार रुपये अधिचा दर मिळत असल्याने, शेतकर्‍यांनी हमीभाव केंद्रांनाच पसंती दिली.

उद्दिष्टापेक्षा जास्त हरभरा खरेदी झाल्याचे कारण पुढे करत २३ मार्च रोजी अचानक राज्यभरातील खरेदी केंद्र ही बंद झाली. याबाबत शेतकरीच काय पण केंद्र चालकही अनभिज्ञ होते. शेतकर्‍यांमधून नाराजी व्यक्त होत असतानाच पुन्हा १८ जूनपर्यंत केंद्र सुरु झाल्याचा निर्णय झाला पण आता पुन्हा एकदा ही केंद्रे बंद करण्यात आली आहे.

रब्बी हंगामात हरभर्‍याचा विक्रमी पेरा झाला होता. त्यामुळे आवक वाढणार हे निश्चित असल्याने बाजारपेठेतील दर घसरणीला सुरवात झाली होती. आता खरेदी केंद्र बंद झाल्याने खुल्या बाजारपेठेशिवाय पर्यांयच नसल्याने पुन्हा एकदा दरात आणखीन घट होण्याचा धोका अधिक आहे.

Exit mobile version