‘या’ महिन्यात कापसाच्या दरात होणार मोठी वाढ; ‘हे’ आहे प्रमुख कारण

cotton-kapus-market-rate

नागपूर : निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदाच्या खरीप हंगामामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका कापसाला बसला आहे. यंदा महिन्याच्या शेवटपर्यंत पाऊस राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे कापसाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. जर उत्पादनात मोठी घट झाली तर कापसाच्या (Cotton) दरात मोठी वाढ होवू शकते, असा अंदाज जाणकारांकडून वर्तविण्यात आला आहे.

महाराष्ट्रात अजूनही मान्सूनचा जोर पहायला मिळतोय. शेतात पाणी साचल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे उत्पादन घटण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. यंदा कापूस लागवडीच्या क्षेत्रात ३ लाख हेक्टरने वाढ झाली आहे. सध्या देशात एकूण ४२ लाख २९ हजार हेक्टर क्षेत्र कापसाच्या लागवडीखाली आहे. त्याचवेळी सध्या कापसाचे दर स्थिर आहेत. १५ सप्टेंबरला पाऊस परतीचा प्रवास उरकून गायब होतो. परंतू यंदा महिन्याच्या शेवटपर्यंत पाऊस राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे कापूस उत्पादक असलेल्या चीन, पाकिस्तान व बांगलादेशमध्ये यंदा पुराने थैमान घातले आहे. यामुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही परिस्थिती पाहता. बाजारपेठेत आवक कमी व मागणी जास्त, अशी परिस्थिती राहण्याची दाट शक्यता आहे. यामुळे नोव्हेंबरमध्ये कापसाला विक्रमी भाव मिळण्याची शेतकर्‍यांना अपेक्षा आहे.

Exit mobile version