निर्यातक्षम भाजीपाला लागवड करण्यासाठी ‘या’ बाबी ठरतात महत्त्वाच्या

bhajipala

नाशिक : शेतकर्‍यांनी भाजीपाला पिकांच्या मानकांचा योग्य वापर तसेच निर्यातीसाठी लागणार्‍या सर्व बाबी अंमलात आणून भाजीपाला पिकवला तर निर्यातीसाठी खूप मोठा वाव आहे. भाजीपाला निर्यात करताना त्याचा दर्जा, आधुनिक पॅकिंग, शीत साखळी, फवारलेल्या औषधांच्या घटक अवशेषाचे प्रमाण या घटकांकडे प्राधान्याने लक्ष देण्याची आवश्यकता असते. निर्यातक्षम भाजीपाल्याचे उत्पादन करण्यासाठी लागवडीपासून ते काढणीपर्यंत योग्यप्रकारे काळजी घेणे, कमीत कमी प्रमाणात कीटकनाशकाचा वापर करणे, कीड-रोग अवशेष मुक्त उत्पादन घेणे किंवा कीटकनाशक/बुरशीनाशकाचे प्रमाण कमीत कमी असणे आणि त्याचप्रमाणे ज्या कीटकनाशकावर/बुरशीनाशकावर भाजीपाला पिकामध्ये वापरण्यास बंदी आहे अशा औषधाचा वापर न करणे आदी प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे.

निर्यातीसाठी विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांचे गुणवत्ता मानांक :

भेंडी : फळे नाजूक व रंग हिरवा, कोवळी लुसलुशीत ६ ते ७ सें.मी. लांब साठवणीस योग्य, एकसारख्या आकाराची, डागविरहित, कोणत्याही प्रकारची इजा झालेली नसावी.
मिरची : गर्द हिरव्या रंगाची, तिखट, साठवणीस योग्य, फळाचा आकार एकसारखा असावा. मिरची ६ ते ७ सें.मी. लांब असावी.
कारले : रंग हिरवा, २५ ते ३० सें.मी. लांबीची असावी. मान बारीक असावी. हिरवी काटेरी असल्यास अधिक चांगले.
गवार : हिरव्या रंगाची असून ७ ते १० सें.मी. लांब असावी आणि कोवळी लुसलुशीत असावी. बी धरलेली जून असू नये.
दुधी भोपळा : २५ ते ३० सें.मी. लांबीचा, दंड गोलाकार, ड्रमच्या आकाराचा आणि फिकट हिरव्या रंगाचा असावा.
टोमॅटो : गोल, मध्यम आकाराचे अगर अंडाकृती असावे. रंगाने लालसर, पूर्ण पिकण्याच्या अगोदरची अवस्था, तसेच वरची साल सुरकुतलेली नसावी तर तुकतुकीत आकर्षक असावी. टोमॅटोचं फळ डागविरहित असावं.

लसूण : गोलाकार, पांढर्‍या रंगाचा ५ सें.मी. व्यासापेक्षा मोठा आकार, मोठी कुडी, एका गड्ड्यात १० ते १५ कुड्या असाव्यात.
बटाटा : ४.५ ते ६.०० सें.मी. आकाराचा पांढरट अंडाकृती असावा. वरची साल आकर्षक असावी.
शेवग्याच्या शेंगा : शेंगा ५० ते ६० सें.मी. लांबीच्या व गरयुक्त असाव्यात तसेच एकसारख्या जाडीच्या आणि लांबीच्या असाव्यात.
कलिंगड : २ ते ३ किलो वजनाची असावीत. आतला गर लाल असावा. कलिंगड कमी बियांचे असावे.
कांदा : दोन प्रकारची निर्यात करू शकतो. एक मोठा कांदा आणि लहान कांदा. मोठ्या कांद्याचा आकार ४ ते ६ सें.मी. असावा. गडद ते फिकट लाल रंग, गोलाकार, तिखट आणि अगदी लहान कांद्यास म्हणजे २ ते ३ सें.मी. आकार (गुलटी) लाल रंगाच्या गोलाकार कांद्यास खूप देशांतून मागणी आहे.

Exit mobile version