रब्बी कांद्याच्या बंपर उत्पादनासाठी ‘हे’ तंत्र आहे महत्त्वाचे

onion-kanda

नाशिक : कांदा हे नगदी पिक आहे. कांद्याच्या दरातील चढउतार ही शेतकर्‍यांसाठी मोठी डोकंदूखी असली तरी अनेक शेतकरी योग्यवेळी व योग्य तंत्रज्ञानाने कांदा लागवड करुन बंपर उत्पादन कमवितात. कांदा लागवडीमध्ये टायमिंगला खूप महत्व असते. रब्बी हंगामाच्या कांद्याची ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात बियांची पेरणी करून डिसेंबर-जानेवारी महिन्यांत रोपांची पुनर्लागवड केली जाते. प्रगत तंत्रज्ञानाने कांद्याचे उत्पादन घेतल्यास शेतकर्‍यांना हमखास नफा मिळतो.

रब्बी हंगामासाठी एन २-४-१, अ‍ॅग्रीफाऊंड लाइट रेड, पुसा रेड, फुले सफेद, फुले सुवर्णा, अर्का निकेतन या प्रगत जाती मानल्या जातात. एक हेक्टर कांदा लागवडीसाठी ८ ते १० किलो बियाणे लागते. लागवडीआधी बीजप्रक्रिया करुन घेणे कधीही फायदेशिरच ठरते. बीजप्रक्रिया केल्यास सुरुवातीच्या अवस्थेमध्ये येणार्‍या कीड रोगांना प्रतिबंध करता येतो. मर रोग प्रतिबंधासाठी कार्बेन्डॅझिम २ ते ३ प्रति किलो बियाणे वापरावे.

रोपवाटिका : रोप तयार करण्यासाठी गादीवाफे तयार करावेत. वाफ्याची रुंदी १ मी., उंची १५ सें.मी. व लांबी ३ ते ४ मीटर असावी. प्रत्येक वाफ्यात दोन घमेली कुजलेले शेणखत, १०० ग्रॅम सुफला १५:१५:१५ आणि ५० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड घालून वाफा एकसारखा करून घ्यावा. प्रत्येक चौरस मीटरवर १० ग्रॅम बियाणे पेरावे. १० सें.मी. अंतरावर २ सें.मी. खोल रुंदीस समांतर रेषा ओढून बी पातळ पेरावे. पेरलेले बी मातीने झाकावे. वाफ्यांना बी उगवेपर्यंत झारीने पाणी द्यावे. पेरणीपूर्वी २ ते ३ ग्रॅम कार्बेन्डॅझिम प्रति कि.ग्रॅ. बियाण्यास चोळावे. रोप निरोगी राहण्यासाठी प्रत्येक वाफ्यात ५० ग्रॅम युरिया व ५ ग्रॅम फेनव्हेल रोपांच्या दोन ओळींमधून द्यावे. बुरशीनाशकाच्या व कीटकनाशकाच्या १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात.

रोपांची काढणी व पुनर्लागवड : रोपांना ६ ते ८ आठवड्यांमध्ये हरभर्‍याच्या दाण्याएवढी गाठ तयार झाली, की त्यांची पुनर्लागवड करावी. रोपांची पुनर्लागवड करण्यापूर्वी पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर वाढवावे. रोपे उपटण्यापूर्वी वाफ्यांना हलके पाणी दिल्यास मुळांना इजा न होता रोपे काढता येतात. रोप उपटल्यानंतर पातीचा शेंड्याकडील १/३ भाग कापून टाकावा. मुळे पाण्यात धुऊन घ्यावीत. सुतळीच्या सहायाने १०० रोपांची गड्डी बांधावी. गड्डी केल्याने रोपांवर पुर्नलागवडपूर्व प्रक्रिया करणे सोपे जाते. लागवडीपूर्व प्रक्रियेसाठी रोपांची मुळे कार्बोसल्फान २ मि.ली. + कार्बेन्डॅझिम १.५ ग्रॅम प्रति लीटर पाणी या प्रमाणात केलेल्या द्रावणात १ तास बुडवावीत. त्यानंतरच पुर्नलागवड करावी. दोन ओळीत १५ सें.मी. व दोन रोपांत १० सें.मी. अंतर ठेवून (सरी-वरंबा) पद्धतीने रोपांची डिसेंबर-जानेवारीपर्यंत पुर्नलागवड करावी.

खते व पाणी व्यवस्थापन : कांदा पिकास हेक्टरी ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. त्यानंतर १ महिन्याने ५० किलो नत्र प्रति हेक्टरी द्यावे. रासायनिक खतांचा वापर माती परीक्षणानुसार करावा. कांदा पिकाला नियमित पाणी देणे महत्त्वाचे असते. रब्बी हंगामात ६ ते ८ दिवसांनी जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. रोपांच्या लागवडीनंतर शेतात तण दिसल्यास हलकी खुरपणी करावी. तसेच कांदा रोप लागवडीनंतर रब्बी हंगामात २५ दिवसांनी ऑक्झीफ्लोरोफेन ७.५ मि.ली. व क्युझेलोफॉप ईथाईल १० मि.ली. प्रति १० लीटर पाणी या प्रमाणात तणनाशकाची एकत्रित फवारणी करावी. त्यानंतर ४५ दिवसांनी एक खुरपणी करावी.

Exit mobile version