टोमॅटोने शेतकर्‍याला बनवले करोडपती; वाचा उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍याची कहाणी

tomato

उस्मानाबाद : केळी, कापूस, ऊस यासारख्या नगदी पिकांच्या माध्यमातून अनेक शेतकरी लाखों रुपयांचे उत्पादन घेत असतात मात्र जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शिराढोणच्या शेतकर्‍याने टोमॅटोच्या शेतीतून वर्षभरात चक्क २ कोटी ५० लाख रुपयांचे उत्पादन घेवून दाखविण्याची किमया केली आहे. बाजारपेठेचा अभ्यास व सुक्ष्म नियोजन हेच त्यांच्या यशाचं गमकं असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांना अनेकवेळा आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. कधी लाल चिखल तर कधी फेकून दिलेले टोमॅटो. मात्र जर शेतकर्‍याने मनाशी ठाणलं आणि त्याला निसर्गाची साथ मिळाली तर काय होवू शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिरढोणंचे सुभाष आणि शरद माकोडे बंधू! त्यांनी वर्षभरात दोन वेळा १२ एकरामध्ये त्यांनी टोमॅटोची लागवड केली आणि यामधून चक्क २ कोटी ५० लाखाचे उत्पन्न घेतले आहे.

माकोडे बंधूंनी गेल्या ७ वर्षापासून त्यांनी हंगामी पिके आणि भाजीपाल्यावर भर दिला आहे. १२ एकरातील शेतीमधून टोमॅटो, कारले, टरबूज यामधूनच ते अधिकचे उत्पादन घेत आहेत. यंदा तर टोमॅटोचे जसे बाजारपेठेत दर वाढत होते त्याच्या कैकपटीने माकोडे यांच्या शेतामधील टोमॅटोचे उत्पादन वाढत होते. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांनी १२ एकरावर टोमॅटोची लागवड केली होती. नोव्हेंबर ते डिसेंबरच्या कालावधीत त्यांना यामधून १ कोटीचे उत्पन्न मिळाले. तर लागलीच त्यांनी पुन्हा १२ एकरावर टोमॅटोचीच लागवड केली होती. मार्चमध्ये लागवड केलेले टोमॅटोची आता बाजारपेठेत आवक सुरु असून दुसर्‍या प्लॉटमधून त्यांना दीड कोटीचे उत्पादन मिळाले आहे.

माकोडे बंधूचा हा प्रयोग व धाडस हे अन्य शेतकर्‍यांना निश्‍चितपणे प्रेरणादायी ठरणारे आहे. अनेक शेतकरी पारंपारिक पिकांची चौकट तोडत नाही, त्यामुळे त्यांचे नुकसान होत असते. यामुळे पिकं पध्दतीत बदल करण्याचे आवाहन नेहमीच केले जाते. मात्र अनेक शेतकरी त्याचं धाडस करत नाही. अशात माकोड बंधूनी केलेले धाडस व त्यातून मिळालेलं यश हे अन्य शेतकर्‍यांना प्रेरणा देणारे आहे.

Exit mobile version