Top Ten Agriculture Universities : जगातील टॉप १० कृषी विद्यापीठे व त्यातील अभ्यासक्रम

Top Ten Agriculture Universities

मुंबई : शेती हा मानवजातीच्या सर्वात जुन्या व्यवसायांपैकी एक आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये कृषी क्षेत्राचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आजमितीला कृषी हे क्षेत्र अनेकांना खुणवू लागले आहे. त्या अनुषंगांने अनेक महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये कृषी संबंधित पदविका, पदवी, पदव्युत्तर शिक्षणासह कृषी संशोधन देखील सुरु आहे. अन्न उत्पादन, फलोत्पादन, पर्यावरण संरक्षण आणि पशुसंवर्धन हे सर्व अभ्यासक्रम कृषी क्षेत्रात शोधले गेले आहेत. कृषी क्षेत्रामध्ये संशोधन आणि विकासाच्या मोठ्या संधी आहेत. यापार्श्‍वभूमीवर आज आपण जगातील सर्वोत्तम कृषी विद्यापीठांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

१. वॅगेनिंगेन यूनिर्व्हसिटी अ‍ॅण्ड रिसर्च, नेदरलँण्ड (Wageningen University & Research in the Netherlands)
वॅगेनिंगेन युनिर्व्हसिटी अ‍ॅण्ड रिसर्च हे नेदरलँड्समधील सार्वजनिक विद्यापीठ आहे. तांत्रिक आणि अभियांत्रिकी शिक्षणासह विज्ञान आणि कृषी संशोधनासाठी हे एक महत्त्वाचे केंद्र आहे. हे जगातील सर्वोत्तम विद्यापीठांपैकी एक मानले जाते. शेतीशी निगडीत अभ्यासक्रमांमध्ये माती, पाणी, वातावरण, प्राणी विज्ञान, अन्न तंत्रज्ञान, पर्यावरण विज्ञान. कृषीशास्त्र (युरोपियन), प्राणी विज्ञान, मत्स्यपालन आणि सागरी संसाधन व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, वनस्पती जैवतंत्रज्ञान, वनस्पती प्रजनन, वनस्पती विज्ञान आदी अभ्यासक्रम शिकवले जातात. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार, हे कृषी आणि वनीकरण क्षेत्रात जगातील सर्वोत्तम आहे. टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंगनुसार वॅजेनिंगेन विद्यापीठ जगातील ६२ व्या क्रमांकावर आहे. नेदरलँड्समध्ये सलग १५ वर्षे प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ म्हणून या विद्यापीठाला पसंती मिळाली आहे.

२. कॅलिफोर्निया यूनिर्व्हसिटी, डेव्हिस, युएसए (The University of California, Davis, USA)
कॅलिफोर्निया विद्यापीठ हे टड वर्ल्ड रँकिंग २०१४ नुसार, हे कृषी आणि वनीकरणाचे जगातील पहिले आणि सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून ओळखले गेले. कॅलिफोर्निया विद्यापीठ कृषी विज्ञान, पर्यावरण विज्ञान सारख्या अनेक क्षेत्रांमध्ये पदवीधर आणि पदवीपूर्व कार्यक्रम देते. हे विद्यापीठ जीवशास्त्र आणि कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यक्रमांसाठी ओळखले जाते. या विद्यापीठात कृषी आणि पर्यावरण शिक्षण, प्राणी जीवशास्त्र, प्राणी विज्ञान, प्राणी विज्ञान आणि व्यवस्थापन, पर्यावरण फलोत्पादन आणि शहरी वनीकरण, जेनेटिक्स अ‍ॅण्ड जियोनॉमिक्स, आंतरराष्ट्रीय कृषी विकास, वनस्पती जीवशास्त्र, वन्यजीव, मासे आणि जैवविविधता संवर्धन आदी अभ्यासक्रम शिकवले जातात.

३. स्वीडिश युनिव्हसिटी ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल सायन्सेस, स्वीडन (Swedish University of Agricultural Sciences, Uppsala in Sweden)
हे जागतिक दर्जाचे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आहे. येथे अध्यापन आणि संशोधन यांचा मिलाफ विद्यार्थ्यांना मनोरंजक, सखोल अभ्यास आणि कौशल्यांसाठी अगणित संधी प्रदान करतो. या विद्यापीठात शहरी आणि प्रादेशिक नियोजन, शास्वत विकास, ग्रामीण विकास आणि हवामान बदल यासारख्या जागतिक समस्या देखील शिकवल्या जातात. या विद्यापीठाचे अभ्यासक्रम आणि पदवी कार्यक्रम हे व्यावसायिक पात्रतेवर आधारित आहेत. यात प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास, कृषी अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन, कृषी, अन्न आणि पर्यावरण धोरण विश्लेषण, कृषी विज्ञान, प्राणी विज्ञान, वन पर्यावरण आणि शाश्‍वत व्यवस्थापन, फलोत्पादन विज्ञान, शाश्‍वत अन्न प्रणाली शाश्‍वत उत्पादनासाठी वनस्पती जीवशास्त्र यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

४. अ‍ॅग्रो पॅरिस टेक, फ्रान्स (AgroParisTech, Paris, France)
अ‍ॅग्रो पॅरिस टेक ही कृषी विज्ञान आणि तंत्र, कृषी अन्न, वनीकरण, कचरा व्यवस्थापन आणि नैसर्गिक संसाधने आणि जमीन व्यवस्थापन आणि विकास या क्षेत्रातील एक भव्य शैक्षणिक आणि संशोधन संस्था आहे. यात संस्थेचे प्रशिक्षण कार्यक्रम आणि संशोधन उपक्रमांच्या उच्च गुणवत्तेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाते.

५. कॉर्नेल यूनिर्व्हसिटी, न्यूयॉर्क, युएसए (Cornell University, Ithaca, United States)
युनायटेड स्टेट्स आयव्ही लीगमधील सर्वात प्रसिद्ध आणि मान्यताप्राप्त विद्यापीठांपैकी एक, कॉर्नेलने त्याच्या सर्व कार्यक्रम आणि अभ्यासक्रमांसाठी जगभरात नाव प्रस्थापित केले आहे. न्यूयॉर्क येथे स्थित, कॉर्नेल विद्यापीठ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रातील अभ्यासक्रमांची विस्तृत श्रेणी देते. यूएस न्यूज आणि वर्ल्ड रिपोर्टनुसार, महाविद्यालयांच्या वार्षिक क्रमवारीत ते देशातील १५ व्या क्रमांकावर आणि कृषी अभ्यासक्रमांसाठी तिसर्‍या स्थानावर आहे. या विद्यापीठात भारतीय विद्यार्थ्यांना टाटातर्फे फेलोशिप दिली जाते. या विद्यापीठात प्राणी विज्ञान, उपयोजित अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन, पर्यावरण विज्ञान, बायोकेमिस्ट्री, आण्विक आणि सेल बायोलॉजी, जैविक आणि पर्यावरण अभियांत्रिकी, अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान, जेनेटिक्स अ‍ॅण्ड डेव्हलेपमेंट, जियोनॉमिक्स, आंतरराष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास, आंतरराष्ट्रीय विकास, वनस्पती प्रजनन, वनस्पती प्रत्यारोपण, प्लांट पॅथॉलॉजी आणि प्लांट मायक्रोबायोलॉजी, वनस्पती संरक्षण, माती आणि पीक विज्ञान आदी अभ्यासक्रम शिकवले जातात.

६. कॅलिफोर्निया यूनिर्व्हसिटी, बर्कले, युएसए (The University of California, Berkeley (UCB) in the United States)
बर्कलेमधील कॅलिफोर्निया विद्यापीठ हे संशोधनाचे माहेरघर असलेले विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. हे जगातील तिसर्‍या क्रमांकावरील सर्वोकृष्ट विद्यापीठ आहे. या विद्यापीठात कृषी आणि संसाधन अर्थशास्त्र, उपयोजित विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी आणि ग्रह विज्ञान, वनस्पती आणि सूक्ष्म जीवशास्त्र, साहित्य विज्ञान आणि अभियांत्रिकी पर्यावरण विज्ञान आदी अभ्यासक्रम शिकवले जातात.

७. इटीएच झुरिच : स्वित्झर्लंडमधील स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (ETH Zurich – Swiss Federal Institute of Technology Zurich in Switzerland )
स्वित्झर्लंडमधील हे एकमेव विद्यापीठ आहे जे कृषी विज्ञानात पदवी कार्यक्रम देते. इटीएच झुरिच ही एक प्रगत शिक्षण संस्था आहे. अल्बर्ट आइनस्टाईन हे नोबेल पारितोषिक विजेत्या संस्थेचे प्रसिद्ध माजी विद्यार्थी होते. सिस्टम ओरिएंटेड नॅचरल सायन्सेस डिव्हिजनमध्ये पृथ्वी विज्ञान, इकोसिस्टम सायन्स आणि आरोग्य विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील १६ प्रमुख शैक्षणिक शाखा आहेत. संस्थेचे संशोधन जागतिक अन्न प्रणाली, हवामान बदल आणि ऊर्जा यासह क्षेत्रांवर केंद्रित आहे. या विद्यापीठात प्रामुख्याने कृषी अर्थशास्त्र, प्राणी विज्ञान, वनस्पती विज्ञान आदी विषय शिकवले जातात.

८. विस्कॉन्सिन-मॅडिसन यूनिर्व्हसिटी, युएसए (University of Wisconsin-Madison, United States)
हे विद्यापीठ त्याच्या कार्यक्रमांसाठी आणि प्रतिष्ठित माजी विद्यार्थ्यांच्या नेटवर्कसाठी प्रसिद्ध आहे. आहे. यूएस न्यूज आणि वर्ल्ड रिपोर्ट सार्वजनिक संस्थांमध्ये ते १३ व्या आणि टड वर्ल्ड रँकिंग त्याच्या कृषी कार्यक्रमांसाठी ४ व्या क्रमांकावर आहे. विद्यापीठ कृषीसह विविध क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम देते. कृषी क्षेत्रातील अभ्यासक्रमांमध्ये कृषी आणि वनीकरण, शिक्षण आणि प्रशिक्षण, समाजशास्त्र आदींचा समावेश होतो.

९. रिडिंग यूनिर्व्हसिटी, यूके (University of Reading, UK)
युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंग यूके हे टॉप ३० युनिव्हर्सिटी आह. मध्य लंडनपासून ट्रेनने २५ मिनिटांच्या अंतरावर आहे. युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगचे यूके मध्ये व्हाइट नाईट्स कॅम्पस, लंडन रोड कॅम्पस आणि ग्रीनलँड कॅम्पस असे तिन स्वतंत्र कॅम्पस आहेत. या विद्यापीठात वनस्पती विविधता, कृषी आणि अन्न अर्थशास्त्र, कृषी अर्थशास्त्र, शाश्‍वत उत्पादन, अन्न अर्थशास्त्र आणि विपणन, संशोधन कृषी, पर्यावरण आणि पर्यावरण आदी विषय शिकवले जातात.

१०. चायना अ‍ॅग्रीकल्चर युनिर्व्हसिटी, बीजिंग (China Agricultural University Beijing, China) 
चायना अ‍ॅग्रिकल्चरल युनिव्हसिटी हे चीनमधील एक आघाडीचे सार्वजनिक-मालकीचे विद्यापीठ आहे. या विद्यापीठातील सर्वात लोकप्रिय अभ्यासक्रमांमध्ये कृषी आणि जीवन विज्ञान, संसाधने आणि पर्यावरण विज्ञान, माहिती आणि संगणक विज्ञान, कृषी अभियांत्रिकी आणि ऑटोमेशन विज्ञान, तसेच अर्थशास्त्र, व्यवस्थापन आणि सामाजिक विज्ञान यांचा समावेश होतो.

Exit mobile version