चारशे टन आंबा निर्यातीतून दोनशे कोटींची उलाढाल

mango

रत्नागिरी : कोकणातील हापूस आणि मराठवाड्यातील केसर आंब्याची चव काही वेगळी असल्याने या आब्यांना बाजारपेठेत मोठी मागणी असते. केवळ स्थानिकच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या आंब्यांच्या माध्यमातून मोठी उलाढाल होते. या हंगामात तब्बल ४०० टन आंब्याची निर्यात झाली असून त्यातून २०० कोटींची उलाढाला झाली आहे. या हंगामात आतापर्यंत जपानमध्ये १२ टन, अमेरिका १२५ टन, ऑस्ट्रेलिया २० टन, इंग्लंड १५० टन तर युरोपमध्ये १०० टन आंब्यांची निर्यात झाली आहे.

महाराष्ट्रातून इंग्लंड, युरोपातील देश, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया आदी देशांमध्ये निर्यात केली जाते. या वर्षी दक्षिण कोरिया आणि जपानच्या निर्यातीला नुकतीच परवानगी मिळाली असून, न्यूझीलंडही बाजारपेठही लवकरच खुली होण्याची शक्यता आहे. देशपातळीवर बोलायचे म्हटल्यास, भारतातून दरवर्षी सुमारे ५० हजार टनांपर्यंत आंब्याची निर्यात होते. यात हापूस, केसर, बैंगनपल्ली, दशहरी, चौसा इ. प्रमुख वाणांचा समावेश आहे.

शेतमाल निर्यातीसाठी राज्यात कृषी पणन मंडळाने कृषी हवामान विभागनिहाय विविध ठिकाणी ४४ निर्यात सुविधा केंद्रे उभारली आहेत. त्यातील ९ सुविधा केंद्राचा वापर आंबा निर्यातीसाठी होतो. विविध देशांच्या निर्यातीच्या निकषानुसार विविध प्रक्रियांसाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रणा उभारल्या आहेत. याचा मोठा फायदा आंबा उत्पादक शेतकरी व व्यापार्‍यांना होत आहे. कृषी विभागाने घेतलेल्या या पुढाकारामुळे आंब्यांची निर्यात निश्‍चितपणे वाढेल, असा विश्‍वास वर्तविण्यात येत आहे.

Exit mobile version