उध्दव ठाकरेंच्या शेतकरी दौर्‍यांवर होतेय टीका, हे आहे कारण

thakare

मुंबई : परतीच्या पावसामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळत नसल्यावरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. माजी मुख्यमंत्री व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावरून भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर टीका केली आहे. मुख्यमंत्री असताना कधी महाराष्ट्र पाहिला नाही आणि आता पद गेल्यावर महाराष्ट्र पाहण्यासाठी दौरे करत आहेत, असा टोला सुजय विखे पाटील यांनी लगावला आहे.

ज्या महाराष्ट्राचे आपण मुख्यमंत्री होतो तो महाराष्ट्र दिसतो कसा हे पाहण्यासाठी ठाकरे सध्या राज्याचा दौरा करत आहे. पद गेल्यानंतर महाराष्ट्राची स्थिती पाहायला त्यांना वेळ मिळाला आहे. मात्र, मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र कधी पाहिलाच नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना निवांत वेळ दिला आहे, अशी खोचक टीका सुजय विखे-पाटील यांनी केली आहे.

विरोधकांकडून सातत्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे, यावर भाष्य करताना, यावर कॅबिनेटमध्ये चर्चा सुरु असते. निकषापेक्षा जास्त मदत करण्याबाबत बागायत, जिरायत क्षेत्रानुसार मदत देणे याबाबत चर्चा सुरु आहे. हे सरकार शेतकर्‍यांच्या हिताचा निर्णय घेईल अशी मला खात्री आहे, असा विश्वास सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

Exit mobile version