कापासावरुन केंद्रीय मंत्र्यांचे मोठे विधान

cotton tree

नवी दिल्ली : कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी चांगल्या दर्जाच्या कापूस बियाणांचा पुरवठा ही काळाची गरज आहे. त्यासाठी संबंधित मंत्रालयांकडून युद्धपातळीवर काही ठोस कृती होण्याची गरज आहे. कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी उच्च उत्पन्न देणार्‍या कापूस बियाणांशी संबंधित प्रगत तंत्रज्ञान आणि उच्च घनता लागवड प्रणाली सारख्या नाविन्यपूर्ण कृषी शास्त्राची ओळख करून देण्याची गरजही आहे, असे मत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केले. भारतीय कापसाचे ब्रँडिंग करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत पीयूष गोयल यांनी व्यक्त केले. ग्राहकांमध्ये कस्तुरी ब्रँडेड उत्पादनांसाठी निष्ठा आणि आकर्षण निर्माण करण्यावर गोयल यांनी भर दिला.

पीयूष गोयल यांनी कापूस मूल्य साखळी संबंधी उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्ली येथे वस्त्रोद्योग सल्लागार गटाबरोबर बैठक घेतली. यावेळी गोयल यांनी कस्तुरी कॉटनची गुणवत्ता, शोध क्षमता आणि ब्रँडिंग यावर भर देण्यासाठी उद्योग आणि त्यांच्या नामित संस्थेने केलेल्या कामाचे कौतुक केले. एसआयएमए -सीडीआरएद्वारा विकसित हातात पकडायच्या कापूस तोडणी यंत्राच्या वापरामुळे शेतकरी उत्पादकांना मदत होईल. याबाबत गोयल यांनी कापड उद्योग आणि उद्योग संघटनांनी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी आणि लोकप्रिय करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. उद्योग संघटना आणि उद्योग नेत्यांनी मिळून हातात पकडायच्या ७५ हजार कापूस तोडणी यंत्रासाठी निधी देण्याचे मान्य केले आहे.

Exit mobile version