शेतकर्‍यांनो नॅनो युरिया वापरा अन् कमी खर्चात उत्पादन वाढवा; जाणून घ्या सविस्तर माहिती

nano uria

पुणे : खरिप हंगामात शेतकर्‍यांना खत टंचाईची भीती वाटत असल्याने हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच शेतकरी धास्तावलेला आहे. ऐन हंगामात खत टंचाई होवू नये म्हणून कृषी विभाग प्रयत्नशिल आहे. दरम्यान, कृषी विभागाने शेतकर्‍यांना नॅनो युरिया वापरण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे कमी खर्चात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणे शक्य असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

रशिया-युक्रेन युध्दासह आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींमुळे रासायनिक खतांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण यासाठी लागणारा कच्चा माल रशिया व युक्रेनमधून आयात केला जातो. ही परिस्थिती पाहता खरिप हंगाम सुरु होण्यापुर्वीच कृषी विभागाकडून विविध पर्याय उपलब्ध करुन दिले जात आहेत. ५०० मिली इफ्को नॅनो युरियाची बाटली ही ४५ किलो युरिया खतापेक्षा अधिक कार्यक्षम आहे. शिवाय युरियाच्या गोणीपेक्षा याचे दरही १० टक्क्यांनी कमी आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचा खर्च कमी होणार असून उत्पादनात वाढ होणार आहे.

युरिया आणि नॅनो युरिया लिक्विड यामध्ये शेतकर्‍यांना हा लिक्विड युरियाच अधिकचा प्रभावी ठरणार आहे. केवळ उत्पादनासाठी नाही तर खर्चाच्या अनुशंगानेही हा युरिया चांगला ठरणार आहे. याचा कमी आकार आणि मोठी क्षमता असा हा नॅनो युरिया आहे. खत टंचाईवर पर्याय म्हणून यंदा नॅनो युरिया शेतकर्‍यांसाठी फायद्याचा ठरणार आहे. पारंपरिक युरिया १०० किलो वापरला तर ३५ किलो पिकांना लागू होतो. द्रवरूप नॅनो युरिया खत अर्धा लिटर वापरले तर ९० टक्के पिकांना लागू होते.

नॅनो युरिया लिक्विडमुळे जमिनीतील जलपातळीची गुणवत्ता सुधारते तर टिकाऊ उत्पादनावर सकारात्मक परिणाम करीत ग्लोबल वार्मिंग कमी करण्यास मदत होते. यामुळे शेतकर्‍यांचा खर्च कमी होणार असून उत्पादनात वाढ होणार आहे. याच अनुशंगाने कृषी विभागाकडून जनजागृती केली जाणार आहे.

Exit mobile version