Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

weather-updates

Weather Alert Maharashtra : राज्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती ओढावली असून अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. अशात हवामान खात्याकडून राज्यांना पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवला असून, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवली आहे.

बंगालच्या उपसागरात हंगामातील दुसरे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे मोसमी वार्‍यांचा जोर कायम आहे. दुसरीकडे पश्चिम किनारपट्टीवर दक्षिण गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या स्थितीच्या प्रभावामुळे राज्यात पुढील पाच दिवस सक्रिय मान्सूनची स्थिती राहील, अशी माहिती आयएमडकडून देण्यात आली आहे. यापार्श्‍वभूमीवर राज्यात २१ जुलैपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुढील पाच दिवस म्हणजे १४ जुलैपर्यंत मुंबई, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्र, ११ व १२ जुलै मराठवाडा व विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यात ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने मोठे संकट ओढवले होते. दरम्यान आणखी चारदिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज असून विशेषतः कोकण, मराठवाडासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

२१ जुलैपर्यंत जोरदार पाऊस
महाराष्ट्रात चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने नद्यांना पूर आला आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात नद्या दुथडी भरून वाहत असून पुरामुळे काही ठिकाणी रस्ते बंद आहेत. रविवारी कोकण, प. महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी असला तरी विदर्भ, मराठवाडा आणि नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. येत्या १३ जुलैपर्यंत राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून ११ जुलैला रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा, पालघरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शकक्यता गृहीत धरून आयएमडीतर्फे या दोन विभागांना पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दुष्काळी मराठवाड्यातही समाधानकारक पाऊस
जुलैमध्ये मराठवाड्यात गत दहा दिवसांत ६०.१ सरासरी अपेक्षित पावसाच्या तुलनेत १२४.८ मिमी पर्जन्यमान झाले आहे. जूनमधील पावसाची तूट भरून एकूण मान्सूनच्या ४० दिवसांत ३४ टक्के जास्त पाऊस पडण्याचा विक्रम झाला. पावसाच्या पुनरागमनाने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात कमी पाऊस पडला, तर दुसर्‍या पंधरवड्यात जेथे पोषक वातावरण तेथेच जोरदार सरी कोसळल्या. पावसाच्या वितरणात कमालीचा फरक राहिला. बीडमध्ये सर्वाधिक १२० टक्के, औरंगाबाद ११०.२, लातूर १०५.८, जालना ९९, उस्मानाबाद ८३, नांदेड ९१, परभणी ९४ आणि हिंगोली सर्वात कमी ७१ टक्केच पाऊस पडला होता. मात्र, जुलै महिन्यात मान्सूनच्या पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले.

Exit mobile version