देशात गव्हाचा साठा पाच वर्षांतील नीचांकावर; वाचा हे आहे कारण

wheat

नवी दिल्ली : सरकारी गोदामांमध्ये असलेला गव्हाचा साठा पाच वर्षांतील नीचांकावर आला असून खुल्या बाजारातील गहू आणि पिठाचे दरही १०५ महिन्यांच्या उच्चाकांवर आहेत. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही चिंता वाढवणारी बाब मानली आहे. खरीप हंगाम अद्याप संपला नसून रब्बी हंगामातील गव्हाची लागवड होणे बाकी आहे. त्यामुळे मार्चच्या मध्यापर्यंत गव्हाचा ताजा साठा येण्याची शक्यता नसून परिणामी दर चढेच राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

देशात गव्हाचा साठा कमी असला तरी तांदळाचा पुरेसा साठा असल्यामुळे काहीसा दिलासाही मिळाला आहे. १ ऑक्टोबर रोजी किमान १०२.५० लाख टन तांदूळ असावा अशी अपेक्षा असताना सध्या २८३.९० लाख टन तांदूळ गोदामांमध्ये आहे. हा साठा गतवर्षीच्या तुलनेत कमी असला तरी गहू आणि तांदळाचा एकत्रित विचार किमान मर्यादेपेक्षा अधिक साठा शिल्लक आहे.

रेशनवरील गहू वगळता खुल्या बाजारात गहू आणि पिठाच्या दरांत सप्टेंबरमध्ये विक्रमी १७.७३ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या आठ महिन्यांमधील ही सर्वाधिक वाढ असून नवा साठा बाजारात येण्यास अवधी असल्यामुळे नजिकच्या भविष्यात दर कमी होण्याची शक्यता नसल्यामुळे आणखी काही महिने चढ्या दरानेच गव्हाची खरेदी ग्राहकांना करावी लागेल.

Exit mobile version