राज्यातील जैविक कीडनाशके व जैविक खते प्रयोगशाळा कुठे आहेत?

fertilizer

मुंबई : शेतात पिकांच्या वाढीसाठी रासायनिक खते व कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत असल्यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडणे, पिकाची उत्पादकता कमी होणे, उत्पादित मालाची प्रत खालावणे, पाणी/वातावरणाचे प्रदूषण होऊन मानव व पशू-पक्षी यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. यासाठी रासायनिक खतांऐवजी जैविक खतांचा वापर करण्याचे आवाहन सरकारतर्फे वारंवार करण्यात येते. जैविक खताच्या वापरामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होऊन उत्पादनखर्चात बचत होते. तसेच पर्यावरणाचे संतुलन राखले जाऊन जमिनीची नैसर्गिक व जैविक सुपीकता टिकून राहून पिकाच्या उत्पादनात व गुणवत्तेमध्ये वाढ होते. जैविक कीडनाशकांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात शासनामार्फत दहा जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळांची स्थापना करण्यात आली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात एक (अहमदनगर), मराठवाड्यात तीन (औरंगाबाद, परभणी व नांदेड), उत्तर महाराष्ट्रात दोन (जळगाव व धुळे) व विदर्भात चार (बुलडाणा, यवतमाळ, अमरावती व वर्धा) प्रयोगशाळा आहेत.

जैविक खताचे महत्त्व लक्षात घेता खरीप २०१६ पासून या प्रयोगशाळांमध्ये जैविक खताचे उत्पादन सुरू करण्यात आले होते. त्यामध्ये रायझोबियम, अ‍ॅझोटोबॅक्टर, अ‍ॅझोस्पिरीलम, अ‍ॅसिटोबॅक्टर. पी.एस.बी. यांचा समावेश असून त्यामध्ये नत्र स्थिरीकरण करणारे, स्फुरद विरघळविणारे, पालाश विरघळविणारे व जस्त विरघळविणारे जिवाणू असतात. ही सर्व खते महारायझो, महाअ‍ॅझोटोबॅक्टर इ.महाब्रँडमध्ये विक्री करण्यात येत आहेत. ही खते महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पिके उदा. कापूस, सोयाबीन, हरभरा, तूर, उडीद, मूग, भुईमूग इ. पिकांना उपयुक्त आहेत.

द्रवरूप जिवाणू संघ मध्ये यापैकी कमीतकमी दोन किंवा अधिक जिवाणूंचा समावेश असतो. एकच जिवाणू असणारे जैविक खत व दोन किंवा अधिक जिवाणू असणारे जिवाणू संघ यांची तुलना केली असता द्रवरुप जिवाणू संघ हा तुलनेने स्वस्त, वापरण्यास सोपा, वाहतूक खर्च कमी, बीज प्रक्रियेसाठी विशेष कौशल्याची आवश्यकता नसलेला एकात्मिक अन्नद्रव्य पुरविण्याचा उद्देश साध्य करणारा जैविक संघ आहे. सध्या सर्व प्रयोगशाळांमधून सदर जैविक खतांची व जैविक कीडनाशकांची विक्री सुरू झालेली आहे. संपर्कासाठी सर्व जैविक प्रयोगशाळांचे पत्ते व फोन नंबर पुढीलप्रमाणे दिले आहेत.

१ जिल्हा फळ रोपवाटिका, परभणी (संपर्क : ७५८८०८२५८९)
२ वाघाळे पेट्रोल पंपासमोर, लातूर फाट्याजवळ, धनेगांव, नांदेड (संपर्क ८३२९६३०००६)
३ कृषि अभियांत्रिकी कार्यशाळा परिसर, तपोवन रोड, अमरावती (संपर्क ९५५२४११३३४)
४ बस स्टँन्डजवळ, भोंडे हॉस्पिटल समोर, धाड रोड, बुलडाणा (संपर्क ९४२२९४१३६५)
५ कृषि चिकित्सालय प्रक्षेत्र, चाळीसगांव रोड, मु. पिंपरी,पो. वडजाई, धुळे (संपर्क ९४२१३०३५६७)
६ मुमराबाद ता. मुमराबाद, जि. जळगांव, (संपर्क ७५८८०४१००८)
७ शहानुरमियाँ दर्गारोड, अभियांत्रिकी कार्यशाळा परिसर कृषि ज्योतीनगर, औरंगाबाद(संपर्क ७०३८६८५२०४)
८ गार्डन रोड, यवतमाळ (संपर्क ८३०८७५६५५५)
९ बीज गुणन केंद्र (सिडफार्म), सावेडी, अहमदनगर (संपर्क ९०९६९४८४०२)
१० मु. पो. सेलू, ता. सेलू जि. वर्धा (संपर्क ७२६२८१८८८०)

Exit mobile version