बैल पोळा का साजरा केला जातो, माहित आहे का?

bail pola 1

जळगाव : भारत हा कृषी प्रधान देश आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाले असले तरी बैल पोळ्याचे महत्व अजूनही कायम आहे. शेतकर्‍यासोबत वर्षभर शेतात राबणार्‍या बैलांचा एकमेव सण पोळा श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.

पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते. ओढा वा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवतात.

प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे शेतकरी बैलांचा साजशृंगार करतात. बैल सजवितात व मिरवणुकीत भाग घेतात. या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. अनेक गावांमध्ये पोळ्याला शर्यतींचे आयोजन करण्यात येते.

शेतकर्‍या साठी सदैव कष्ट करणार्‍या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ग्रामीण भागातील लोक पोळ्याला खूप महत्त्व देतात. महाराष्ट्राच्या काही भागात हा सण दोन दिवस साजरा केला जातो. बैलपोळा म्हणजेच पहिल्या दिवसाला मोठा पोळा आणि दुसर्‍या दिवसाला लहान मुले लाकडाचे नंदीबैल सजवितात याला तान्हा पोळा म्हणून साजरा केला जातो. विदर्भातील शेतकरी या सणाला खूप महत्त्व देतात. कारण विदर्भातील शेती बहुदा बैलावर अवलंबून आहे. त्यामुळे पारंपारिक दृष्टीने बैल पोळा हा सण बैलांनी शेतीमध्ये केलेल्या मदतीसाठी त्यांचे आभार मानण्यासाठी साजरा केला जातो.

Exit mobile version