शेतकर्‍याला बळीराजा का म्हणतात?

baliraja

दिवाळीतील महत्वपूर्ण दिवस म्हणजे बलिप्रतिपदा. हा विक्रम संवताचा प्रारंभदिन असून हिंदूंच्या साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी हा अर्धा शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी ग्रामीण भागात बलिप्रतिपदेला माता-बहिणी ‘इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो’ असे म्हणत घरातील पुरूषांना ओवाळतात. आपल्याकडे शेतकर्‍याला बळीराजा म्हटले जाते ‘इडा-पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’ अशी म्हणदेखील आहे. मात्र शेतकर्‍याला बळीराजा का म्हणतात? असा प्रश्‍न अनेकांना पडतो. याविषयी अनेक मतेमतांतरे आहेत. याचा संबंध दोन वेगवेगळ्या संदर्भांशी जोडला जातो.

पहिली मान्यता
बलिप्रतिपदा हा दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. यातील बली हा राजा हा शेतकर्‍यांचा राजा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शेतकरी आजही बळीराजा म्हणून ओळखला जातो, असे मानले जाते. पुराणकथेनुसार बली हा राजा हा सप्तचिरजीवी, प्रख्यात विष्णु भक्त आणि उत्कृष्ट योद्धा होता. असुरराज बळी सर्व युद्ध तंत्रात निपुण होता. खंडोबा, म्हसोबा, मल्हार, मरतड हे बळीराजाच्या मंत्रिमंडळातील कार्यक्षम मंत्री होते, असे मानतात. बळीराजाचे राज्य नऊ खंडी होते. प्रत्येक खंडाच्या प्रमुखाला ‘खंडोबा’ म्हटले जात असे. प्रत्येक खंडात छोटे छोटे सुभे (जिल्हे) असायचे. अनेक सुभ्यांचा मिळून एक महासुभा असायचा. या महासुभ्याचा प्रमुख महासुभेदार म्हणजे म्हसोबा होय, अशी भावना आहे. बलिप्रतिपदेला केवळ बळीराजाचीच पूजा होते, असे नाही तर त्याच्या या मंत्री व अधिकार्‍यांचीही पूजा होते. यावरून बळीच्या राज्यात प्रजा किती सुखी व संपन्न होती, हे लक्षात येईल.

बळी व इंद्र यांच्या संघर्षाची वर्णने पुराणांतून वारंवार आढळतात. एकदा बळीने इंद्राचा पराभव करून त्याच्या संपत्तीचे हरण केले होते. ती संपत्ती समुद्रात पडली तेव्हा ती परत मिळविण्यासाठी देवांनी बळीच्या मदतीने समुद्रमंथन केले. समुद्रमंथनातून निर्माण झालेल्या रत्नांवर देवासुराचा लढा सुरू झाला आणि असुर आणि देव यांच्यात युद्ध सुरू झाले, तेव्हा असुरांनी आपल्या मायावी शक्तींचा वापर करून युद्धात देवांवर मात केली. त्यानंतर राजा बळीने विश्वजित आणि शंभर अश्वमेध यज्ञ करून तिन्ही क्षेत्रांचा ताबा घेतला. नंतर शेवटचा अश्वमेध यज्ञ संपत असताना दानासाठी विष्णू वामनाच्या रूपात प्रकट झाले. वामनाने दानाच्या बदल्यात तीन पावले जमीन मागितली आणि संकल्प पूर्ण होताच त्याने विशाल रूप धारण केले आणि पहिल्या दोन पावलांमध्ये पृथ्वी आणि आकाश मोजले. विष्णूने वामनावतारात याच्या मस्तकावर पाय ठेवून याला सुतल नावाच्या पाताळात गाडले, अशी कथा आहे. येथे ‘वामन’ या शब्दाचा संस्कृतनुसार अर्थ ‘छोटा’ असा आहे; तो जातीविशेष नाही हे लक्षात घेतले पाहिजे. बलीप्रतिपदेला बळीराजा पुन्हा आपल्या प्रजेला भेटायला येतो, अशी भावना आहे. म्हणून या दिवशी घराघरात बलिपूजन केले जाते. या दिवशी तांदळांनी बळीची आकृती काढून वा त्याचे पंचरंगी चित्र काढून त्याची पूजा केली जाते. शेणाचा बळीराजा करण्याचाही प्रघात आहे.

दुसरी मान्यता
बळीराजा संदर्भातील दुसर्‍या मान्यते नुसार, असुर वंशातील बली राजा याचा शेतकर्‍यांच्या बळीराजाशी काहीएक संबंध नाही. भगवान श्रीकृष्णाचे बंधू आणि शेषाचे अवतार मानले गेलेले बलराम हे शेतकर्‍यांचे ‘बळीराजा’ होते, अशी देखील मान्यता आहे. याचे कारण म्हणजे, जर तुम्ही बलरामाच्या मूर्ती पाहिल्या लक्षात येते की, त्यांच्या एका हातात गदा किंवा मुसळ तर दुसर्‍या हातात किंवा खांद्यावर नांगर दिसते. मुसळ आणि नांगर शेतकर्‍यांचे प्रतिक आहे. तीच दोन्ही आयुधे बलरामांच्या हातात आहेत. बलरामांनाच उद्देशून बलीराम, बल, बली, संकर्षण अशी विविध नावेदेखील वापरण्यात आली आहेत. याशिवाय; भगवान श्रीकृष्णांनी वसवलेल्या द्वारिकानगरीचे सम्राटपद हे बलरामांकडे होते. म्हणून ‘बळीराजा’ असेही त्यांना म्हटले जाते. या दुसर्‍या मान्यतेनुसार बलराम हेच खरे बळीराजा होते, अशी धारणा आहे.

Exit mobile version