पावसाळा सुरु होत असतांना धान उत्पादकांना सतावतेय ‘ही’ चिंता

grain growers

गडचिरोली : पावसाळा तोंडावर असतानाही जिल्ह्यात खरेदी केंद्र सुरु झाले नसल्याने धान पिकाची विक्री करावी तरी कुठे हा प्रश्न निर्माण होत आहे. पीक कापणी होऊन दोन महिने उलटले तरी धान पीक अजूनही शेतातच पडून आहे. आता पावसाळा सुरु होत असल्याने धान पीकाचं काय होईल? याची चिंता शेतकर्‍यांना सतावू लागली आहे.

गडचिरोली जिल्ह्यामध्ये धान पीक हे मुख्य उत्पादनाचे साधन आहे. शिवाय पाण्याची व्यवस्था झाल्याने या क्षेत्रात वाढ होत आहे. १२ ही तालुक्यांमध्ये लागवड मोठ्या प्रमाणात असून उत्पादकताही वाढत आहे. सर्वकाही पोषक असताना राज्य सरकारच्या धोरणाचा फटका शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे.

धान कापणी झाल्यानंतर शेतकर्‍यांनी शेतीमाल हा शेतामध्येच साठवणूक करुन ठेवला होता. शिवाय लागलीच खरेदी केंद्र सुरु झाले तर विक्री सोईस्कर होईल असे शेतकर्‍यांचे गणित होते. पण जिल्हाभरात आदिवासी विकास महामंडळाकडून अद्याप खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. त्यामुळे उघड्यावर असलेल्या धान पिकाला आता पावसाचा धोका आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे धान पिकाचे नुकसान हे ठरलेलेच आहे. त्यामुळे प्रति क्विटल ७०० रुपये बोनस देण्याचे सरकारचे धोरण आहे. मात्र, यामध्येही गेल्या वर्षापासून खंड पडला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना ना उत्पादनाचा आधार आहे ना बोनसचा. शेतकर्‍यांचा बोनस थेट खात्यावर जमा करण्याची मोहिम राज्य सरकराने हाती घेतली होती. मात्र, ही प्रक्रियाच पूर्ण न झाल्याने गतवर्षीपासून शेतकर्‍यांना हक्काचा बोनसही मिळालेला नाही. यातच आता खरेदी केंद्रच सुरु नसल्याने बोनसचा विषय येण्याचा प्रश्‍नच नाही.

Exit mobile version