या अधुनिक तंत्रज्ञानाने हरभरा लागवड केल्यास मिळेल भरघोस उत्पादन

harbhara

औरंगाबाद : हरभरा हे पीक रब्बी हंगामात घेतले जाते. हरभरा पिकास कोरडे व थंड हवामान मानवते. थंडीचे दिवस जितके जास्त मिळतील तितके पीक वाढीस पोषक ठरुन उत्पादनात वाढ होते. हरभरा पिकाची पेरणी १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत करावी. पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी प्रतीची जमीन हरभरा पिकासाठी उत्तम मानली जाते. या पिकाची पेरणी ही सोयाबीन, मुग, उडीद, भाजीपाला, धान इ. पिक खरीपात घेतल्यानंतरच त्याच जमिनीत केली जाते. खरीप हंगामातील पिकांद्रारे अन्नद्रव्यांची झालेली उचल ही जर आपण भरुन काढली नाही, तर हरभरा या पिकाचे अधिक तसेच दर्जेदार उत्पादन घेणे शक्य नसते.

खरीपातील पीकानंतर जमीनीची उभी आडवी खोल नांगरणी करुन व वखराच्या तीन ते चार पाळया देऊन जमीन भुसभुशीत करावी. उताराला आडवे सरी पाडून हरभरा पेरणीसाठी जमीन तयार ठेवावी. पेरणीपूर्वी जमिनीत किमान हेक्टरी १५ ते २० गाड्या चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरवून पुन्हा वखराची शेवटची पाळी द्यावी.Mहरभरा पीक हे कोरडवाहू असले तरी पेरणी जमिनीत पुरेसा ओलावा असेल तरच करावी आणि बियाणे ओलाव्यात पडेल याची संपूर्ण काळजी घ्यावी. पेरणीसाठी दोन ओळीतील अंतर ८० सें.मी. व दोन झाडातील अंतर १०० सें.मी.ठेवावे. वाण परत्वे प्रती हेक्टरी ६० ते १०० किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा बाव्हिस्टिन २ ग्रॅम प्रति किलो चोळावे.

पेरणीपासून ३० ते ४० दिवसाचे आत तणांचे प्रमाण लक्षात घेऊन एक किंवा दोन वेळा निंदणी करुन शेतामधील तण नियंत्रण करावे. हरभर्‍याच्या अधिक उत्पन्नासाठी पिकावर २ टक्के युरिया फवारणी करावी आणि त्यानंतर १० दिवसांनी दुसरी फवारणी करावी. अधिक उत्पादनासाठी रासायनिक खते देणे गरजेचे असते. प्रती हेक्टरी २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद द्यावे. संपूर्ण मात्रा पेरणीच्या वेळीच द्यावी.

Exit mobile version