नगरपंचायत निवडणुकीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याचे १५ लाखांचे नुकसान, वाचा सविस्तर

फोटो प्रतीकात्मक

सोलापूर : नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीतील आकसापोटी ढोराळे (ता. बार्शी) येथील अडीच एकर द्राक्ष शेतातील विक्रीस आलेले द्राक्ष घड तोडून पंधरा ते वीस लाख रुपयांचे नुकसान केल्याची घटना घडली आहे. याबाबत शेतकरी इस्माईल पटेल यांनी अज्ञात इसमांविरोधात वैराग पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पटेल हे भाजपाचे कार्यकर्ते आहेत.

इस्माईल पटेल यांचे वैराग-तडवळे रोडवर ढोराळे हद्दीत दहा एकर शेत आहे. यापैकी अडीच एकर क्षेत्रावर माणिक चमन जातीचे द्राक्ष पीक असून, पुढील आठवड्यात विक्रीस जाणार होते. दरम्यान, गुरुवार ते शुक्रवाच्या मध्यरात्री अज्ञात इसमांनी नुकत्याच झालेल्या नगरपंचायतच्या निवडणुकीतील आकसापोटी८० टक्के द्राक्ष घड तोडून जमिनीवर टाकले, तसेच ठिबक सिंचनच्या नळ्या, पाइप तोडून नुकसान केले. त्याचबरोबर इलेक्ट्रिक मोटार चोरून नेल्याची फिर्याद इस्माईल पटेल यांनी दिली आहे.

आधीच अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्ष बागा वाचविण्यासाठी शेतकर्‍यांना मोठा खर्च करुन मेहनत घ्यावी लागत आहे. कसे बसे करुन बागांची जोपासणा करत असतांना आता राजकीय खुन्नशीतून संपूर्ण बागाच उद्ध्वस्त करण्यात आल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेण्यात आला आहे.

Exit mobile version